शिरोळ : आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी आज सोमवारी एकदिवसीय होणाऱ्या राज्यव्यापी संपात जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक आशा व गटप्रवर्तक सहभागी होणार आहेत, अशी माहिती युनियनच्या जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील यांनी दिली.
कोरोना लसीकरण मोहिमेत आशा व गटप्रवर्तकांना सामील करून घेतले असून, त्यांना कोणतीही सुरक्षेची साधने देण्यात आलेली नाहीत. तरीही घरोघरी सर्वेक्षण व तपासणी करणे, कोविड सेंटर व लसीकरण केंद्रावर ड्युटी तसेच होम क्वारंटाईन असलेल्यांची ऑक्सिजन पातळी तपासणी आदी कामे त्यांच्याकडून विनामोबदला करून घेतली जात आहेत. त्यामुळे त्यांना किमान वेतन लागू करावे. कोविड लसीकरणासाठी मानधनाची विशेष तरतूद करावी. कोविड सुरक्षाचे साहित्य व विमा संरक्षण द्यावे. प्रतिदिन ३०० रुपये मोबदला देण्यात यावा, या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. याबाबतचे निवेदन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार यांना देण्यात आले. यावेळी माया पाटील, सुरय्या तेरदाळे उपस्थित होत्या.
फोटो - २३०५२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना निवेदन देण्यात आले.