कोल्हापूर: मानधन वाढीचा आदेश काढण्यास चालढकल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध म्हणून येत्या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा निर्णय आशा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. शनिवारी आंदोलनाच्या तेराव्या दिवशी बिंदू चौकात आशांनी एकत्र जमून डोक्याला काळ्या फिती बांधून आंदोलन केले. एक हजारहून अधिक आशांनी यात सहभाग घेतला.शासनाकडे दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे दुप्पट आणि तिप्पट मानधनाचा आदेश त्वरीत काढावा या मागणीसाठी जिल्ह्यातील आशा कर्मचाऱ्यांचे तीन सप्टेबरपासून आंदोलन सुरु आहे. कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या अध्यक्ष नेत्रदीपा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या आंदोलनाचा शनिवारी तेरावा दिवस होता.
निषेध मोर्चे काढून, घोषणा देऊनही सरकार आवाज ऐकत नसल्याचा निषेध म्हणून आशांनी शनिवारी बिंदू चौकात शांततेचे प्रतीक असलेल्या पांढऱ्या साड्या परिधान करुन त्यावर काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध नोंदवला.सकाळी चौकातील फुले, आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करुन सुरु झालेले आंदोलन दुपारी तीनपर्यंत चालले. आंदोलनस्थळी ऋतूराज पाटील यांनी भेट देऊन पाठींबा व्यक्त केला. चंद्रकांत यादव, भरमा कांबळे, शिवाजी मगदूम यांच्यासह नेत्रदीपा पाटील यांनी आंदोलकांसमोर मार्गदर्शन केले.
यावेळी येत्या सोमवारी १६ रोजी मुख्यमंत्री कोल्हापुरात महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने येत असल्याने त्यांच्याकडे भेटीची वेळ मागण्याचे ठरले. ती न दिल्यास सोमवारी सकाळपासूनच रेल्वे स्टेशनसमोर जमून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री येईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवले जाणार आहे. ते आल्यावर रास्तो रोको करुन त्यांचा ताफा पुढे जाऊ द्यायचा नाही, असा निर्णय घेण्याचे ठरले.यावेळी उज्वला पाटील, संगीता पाटील, सुप्रिया गुदले, सारिका पाटील, ज्योती तावरे, वसुधा बोडके, मंदाकिनी कोडक, विमल अतिग्रे, सुरैय्या तेरदाळे, सुरेखा तिसंगीकर, सारिका जाधव, महादेवी कोळी, महादेवी पाटील, ज्योती पाटील, राधिका घाटगे, पुनम माळी, सरिता कांबळे यांच्यासह आशा, गटप्रवर्तकांनी सहभाग घेतला.