कोल्हापूर : संपूर्ण जगाला मानवता आणि विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी बंगलोर येथील मानव एकता मिशनने काढलेल्या ‘वॉक आॅफ होप’ अर्थात ‘आशा यात्रा’ या पदयात्रेचे येत्या मंगळवारी (१९ मे) कोल्हापुरात आगमन होत असून, पदयात्रेचे कोल्हापुरात जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. या पदयात्रेचे कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक, श्रीमंत शाहू छत्रपती, गुरुनाथ मुंगळे गुरुजी, विश्वशांती केंद्र, आळंदी; माईर्स एमआयटी पुणेचे प्रा. डॉ. विश्वनाथ क राड, माजी मंत्री सतेज पाटील, डॉ. चंद्रकांत पांडव, डॉ. एस. एन. पठाण, रतनलाल सोनया, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, श्रीपती खंचनाळे, दीनानाथसिंह, दादू चौगले, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत होणार आहे.महायोगी गुरू श्री एम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कन्याकुमारी ते काश्मीर’ ही पदयात्रा निघाली असून, ती साडेसात हजार किलोमीटरचा अकरा राज्यांचा प्रवास करणार आहे. पदयात्रा मंगळवारी सकाळी सव्वासात वाजता दसरा चौकातील शाहू महाराज पुतळ्याजवळ येईल. त्यानंतर पदयात्रेसाठी बनविलेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम महाराज, भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमा असलेला आणि भारतीय युवकांचे अधिष्ठान असलेल्या स्वामी विवेकानंद यांचा पुतळा असलेला चित्ररथ या पदयात्रेत सहभागी होणार आहे. वारकऱ्यांच्या आणि कीर्तनकारांच्या टाळ-मृदंगाच्या गजरात ही पदयात्रा अंबाबाई मंदिर चौकात पोहोचणार आहे. तेथे अंबाबाईच्या नावाने भजन व जोगव्याचा कार्यक्रम होणार आहे. आरती झाल्यानंतर पदयात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.(प्रतिनिधी)
‘आशा यात्रा’ मंगळवारी कोल्हापुरात
By admin | Published: May 15, 2015 9:50 PM