कोल्हापूर : आपल्या भक्तीत अवघ्या महाराष्ट्राला लीन करणाऱ्या सावळ्या विठूमाउलीची आषाढी एकादशी आज मंगळवारी साजरी होत आहे. कोरोनामुळे सध्या मंदिरे भाविकांसाठी बंद असली तरी दरवर्षीप्रमाणे देवाचे धार्मिक विधी पार पडणार आहेत. मिरजकर येथील विठ्ठल मंदिरातून सकाळी ८ वाजता कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळसाठी पालखीचे वाहनातून प्रस्थान होईल.
आषाढी एकादशी म्हणजे श्री विठ्ठलाचा वर्षातील आनंदसोहळा, वारीत लीन होणारे वारकरी, पंढरपुरात जमणारा वैष्णवांचा मेळा आणि विठ्ठलनामाचा अखंड गजर करणारे भाविक. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे सर्वच मंदिरे भाविकांसाठी बंद आहेत. ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा भक्तमंडळ व जय शिवराय फुटबॉल प्लेयर तरुण मंडळ यांच्यावतीने काढण्यात येणारी कोल्हापूर-नंदवाळ वारीदेखील वाहनातून जाणार आहे. त्यामुळे घरात राहूनच कोल्हापूरकरांना विठ्ठलाला नमस्कार करावा लागणार आहे. एकादशीनिमित्त शहरातील मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिराला रंगरंगोटी व सजावट करण्यात आली होती. येथून आज सकाळी ८ वाजता नंदवाळसाठी पालखीचे प्रस्थान होईल. आमदार ऋतुराज पाटील, महालक्ष्मी कॅलेंडरचे रणवीर शिर्के, ऋतुराज क्षीरसागर, ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव देशमुख यांच्या हस्ते आरती होईल. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, विश्व हिंदू परिषदेचे अॅड. रणजितसिंह घाटगे यांच्या हस्ते माउली अश्वाचे पूजन होईल. त्यानंतर पालखीचे वाहनातून नंदवाळसाठी प्रस्थान होणार आहे, अशी माहिती दिंडीप्रमुख ह.भ.प आनंदराव लाड महाराज व बाळासाहेब पवार यांनी सांगितले. दुसरीकडे एकादशीनिमित्त साबूदाणा, वरीचे तांदूळ, शेंगदाणे, राजगिरा लाडू, केळी अशा उपवासाच्या साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होती.
--
फोटो स्वतंत्र पाठवला जाईल.