कोल्हापूर सिटूच्या माध्यमातून आशा आणि गटप्रवर्तकांनी बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. घोषणांनी हा सर्व परिसर दणाणून गेला. अखेर चर्चेमध्ये जिल्हा परिषदेच्या पातळीवर ज्या मागण्या आहेत त्या मार्गी लावू, असे आश्वासन अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अध्यक्ष पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील संघटनेने दिला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावरील आशा व गटप्रवर्तक यांचा प्रोत्साहनपर भत्ता मागील वर्षाच्या फरकासहित ज्या ग्रामपंचायती देण्यास नकार देतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना ग्रामपंचायत विभागाला देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद सेस फंडातून आशा व गटप्रवर्तक वर्षातून एकदा ५०० रुपये सन्मान निधी देण्यासाठी प्रयत्न करू, नियमित मानधनासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करून तालुका स्तरावर वर्ग करण्यात आले आहेत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या मानधनवाढीचा पाठपुरावा करू. केंद्र शासनाचा कोविड- १९ साठीचा बंद झालेला भत्ता पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, यासह अन्य मागण्यांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, आशा समन्वयक नजिमा खान, सिटू कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव, जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, नेत्रदीपा पाटील, उज्ज्वला पाटील, संगीता पाटील, ज्योती तावरे, सदा मलाबादे यांनी भाग घेतला.
१५०९२०२१ कोल झेडपी ०१
जिल्हा परिषदेसमोर बुधवारी आशा व गटप्रवर्तकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले.
छाया नसीर अत्तार