कोल्हापूर : राज्यात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी मुंबईत १८ ते २० फेब्रुवारीला ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स’ या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन केले आहे. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र स्टार्ट अप अंडर ३०’ या स्पर्धेचेही आयोजन केले आहे. या परिषदेस तसेच स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक आणि नवउद्योजकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केले आहे.
राज्यात गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने यावर्षातील पहिली मोठी आर्थिक झेप घेत राज्यातील पहिल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र-कन्व्हर्जन्स २०१८’ या जागतिक गुंतवणूक परिषदेची घोषणा केली आहे. अत्याधुनिक उत्पादनाला चालना देण्यासाठी तसेच, पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए ग्राऊंडवर ही परिषद होत आहे. ही पहिलीच तीन दिवसीय जागतिक गुंतवणूक परिषद रोजगार, शाश्वतता, पायाभूत सोयी-सुविधा आणि भविष्यकालीन उद्योग या चार मुख्य स्तंभांवर आधारलेली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.
जागतिक गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून, ‘महाराष्ट्राची भारतातील सर्व औद्योगिक गुंतवणुकीचे प्रवेशद्वार’ ही ओळख आणखी भक्कम करण्याचा सरकारचा हेतू आहे.‘मॅग्नेटिक महाराष्ट्र-कन्व्हर्जन्स २०१८’ या उपक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तीनदिवसीय परिषदेत संवादात्मक परिषदा, चर्चासत्रे, सीईओ राऊंड टेबल परिषदा, बी टू बी आणि बी टू जी बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.५० लाखांचे बक्षीस..‘मॅग्नेटिक महाराष्ट्र स्टार्टअप अंडर ३०’ या स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या व्यावसायिकाला बक्षीस म्हणून ५० लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात येणार असून द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला अनुक्रमे ३० लाख व २० लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.वित्त वर्षात यात आणखी ९.४ टक्के वाढ होण्यासाठी प्रयत्न.या वित्त वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ४५.४२ टक्के एकूण परकीय गुंतवणूक.महाराष्ट्र ही भारताची आर्थिक राजधानी.मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून भारताची उत्पादन व व्यापार राजधानी बनविण्याचे प्रयत्न.