कोल्हापूर : कोल्हापूरसहसांगली जिल्ह्यात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून धूम ठोकणा-या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि. ८) अटक केली. लक्ष्मण चंद्रकांत चाळके (वय ३२, रा. चांदोली वसाहत, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्या चौकशीत चार गुन्ह्यांची उकल झाली असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील सुमारे सहा तोळे दागिने आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा एकूण चार लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत चोरट्यांवर लक्ष्य केंद्रीत केले होते. आष्टा येथील सराईत चोरटा लक्ष्मण चाळके हा चोरीतील मुद्देमालाची विक्री करण्यासाठी गिरोली घाटातील दख्खन कॅफे हॉटेलसमोर येणार असल्याची माहिती निरीक्षक महादेव वाघमोडे यांना मिळाली होती.त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी (दि. ८) सापळा रचून चाळके याला अटक केली. तो नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून आला होता. अधिक चौकशीत त्याने शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी आणि वडगाव, तसेच कोडोली (ता. पन्हाळा) आणि शिराळा तालुक्यातील बिऊर येथे महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीतील चार लाख नऊ हजार ७२० रुपयांचे दागिने जप्त केले. पुढील तपासासाठी आरोपीचा ताबा कोडोली पोलिसांकडे देण्यात आला.
यांनी केली कारवाईसहायक पोलिस निरीक्षक वाघ यांच्यासह कॉन्स्टेबल प्रकाश पाटील, हिंदुराव केसरे, विनोद चौगुले, सागर कांडगावे, दीपक घोरपडे, शिवानंद स्वामी, संतोष पाटील आणि राजेंद्र वरंडेकर यांच्या पथकाने कारवाई केली.