वारकरी परंपरा बळकट करणारा मुरगूडमधील अष्टमी महोत्सव
शंभरावे वर्ष
पाटील कुटुंबीयांचे वेगळेपण
मुरगूड :- अनिल पाटील:-
स्वातंत्र्यपूर्व काळापासून वारकरी परंपरा बळकट करण्यासाठी मुरगूड, ता.कागल येथील पाटील कुटुंबीयांनी सुरू केलेल्या अष्टमी महोत्सवाचे शंभरावे वर्ष आहे.
या उत्सवात आठ दिवस राज्यातील विविध प्रवचनकार, कीर्तनकारांची हजेरी आणि समाजप्रबोधन यामध्ये आतापर्यंत कधीच खंड पडला नाही. अखंडितपणे उत्साहात पार पडणार हा श्रीकृष्ण अष्टमी महोत्सव हा पाटील घराण्याचे वेगळेपण आहे. यावर्षी मात्र कोरोनामुळे कोणतेही धार्मिक कार्यक्रम पार पडणार नसल्याचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी सांगितले.
मुरगूड शहराच्या नगराध्यक्षपदी सर्वात अधिक काळ काम केलेले माजी नगराध्यक्ष विश्वनाथराव पाटील व पहिले नगराध्यक्ष विठ्ठलराव पाटील यांचे आजोबा भाऊसाहेब पाटील यांनी सन १९२० ला मुरगूडमध्ये कृष्ण भक्ती बळकट करण्यासाठी अष्टमी उत्सव सुरू केला. सुरुवातीस काही वर्षे जिजो महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवचन कीर्तन सुरू झाले. मर्यादित असणाऱ्या उत्सवामध्ये हळूहळू व्यापकता आली. परिसरातील ग्रामस्थ आठ ते दहा दिवस या उत्सवाला हजेरी लावण्यासाठी आपली घरे बंद करून जनावरे आपल्या सोबत घेऊनच मुरगूडला येत.
अष्टमी उत्सव सुरू झाल्यानंतर विठ्ठलराव आणि हरीभाऊ यांचा जन्म झाला. त्यामुळे या उत्सवाची व्यापकता वाढली. पुढे काही वर्षात मोठं मोठ्या नैसर्गिक आपत्ती आली तरी ही या उत्सवात खंड पडू दिला नाही. १९२५ च्या सुमारास हा उत्सव काही काळ गावाच्या बाहेर साजरा केला गेला. सद्या ही या अष्टमी उत्सवात आठ दिवस राज्यातील प्रमुख प्रवचनकार व कीर्तनकार यांचे कार्यक्रम होतात हजारो भाविक या कार्यक्रमाला हजेरी लावतात.
फोटो ओळ :-
मुरगूड, ता कागल येथील पाटील कुटुंबीयांच्या अष्टमी उत्सवात अशा पद्धतीने प्रवचन कीर्तन असते. दुसऱ्या छायाचित्रात उत्सव मूर्ती