कोल्हापूर , 28 : शारदीय नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेला (गुरूवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रुपात भक्तांसमोर आली. यादिवशीच आदिशक्ती देवीने महिषासूराचा वध केल्याने ही पूजा बांधली जाते. रात्री फुलांनी सजलेल्या वाहनातून देवीची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली.
शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. यादिवशी अंबाबाईने (दुगेर्ने) महिषासुराचा वध केला. त्यामुळे दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली.
नवरात्रौत्सवात रोज रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईची पालखी मंदिरात काढली जाते. मात्र, अष्टमीला देवी स्वत: फुलांनी सजवलेल्या वाहनात विराजमान होऊन नगरवासीयांच्या भेटीला निघते. रविवारी रात्री साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीनंतर अंबाबाईची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली.