कोल्हापूर : नव्या सभागृहातील पहिल्या महापौर म्हणून काँग्रेसकडून अश्विनी अमर रामाणे यांचे नाव स्पर्धेत पुढे आले आहे. त्यांनाच ही संधी मिळण्याची शक्यता ठळक झाली आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील प्रभाग व विधानपरिषदेच्या निवडणुकीतील राजकारण या दोन्ही निकषांवर त्यांचे नाव पुढे सरकले आहे. महापौरपद ‘नागरिकांचा मागासवर्ग महिला’ या प्रवर्गासाठी आरक्षित आहे.महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी झाली आहे. त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे; परंतु तरीही भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महापौर आपलाच होणार, असे जाहीर केल्याने दोन्ही काँग्रेसकडून अधिक दक्षता बाळगली जात आहे. महापालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत व दोघा अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. निवडून आलेले सर्वच नगरसेवक काँग्रेसअंतर्गत सतेज पाटील व पी. एन. पाटील यांना मानणारे आहेत. काँग्रेसकडून स्वाती यवलुजे, अश्विनी रामाणे आणि दीपा मगदूम यांची नावे पहिल्या टप्प्यात महापौरपदाच्या स्पर्धेत होती. त्यातही सतेज पाटील यांना याही निवडणुकीत कसबा बावड्याने भक्कम पाठबळ दिल्याने लाल दिव्याची गाडी ते पुन्हा बावड्याला नेतील व स्वाती यवलुजे यांना ही संधी मिळेल, असे संकेत होते; परंतु त्यांचे नाव मागे पडल्याचे दिसत आहे.महापौर निवडीला जोडूनच सध्या विधानपरिषदेच्या राजकारणानेही उकळी घेतली आहे. त्यामुळे तो संदर्भही या निवडीला आहे. अश्विनी रामाणे या शासकीय मध्यवर्ती कारागृह (प्रभाग क्रमांक ७७) मधून निवडून आल्या आहेत. हा प्रभाग कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात येतो. त्याशिवाय रामाणे यांचे सासरे मधुकर रामाणे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. गेल्या सभागृहात त्यांनी कोणतेच पद घेतलेले नाही. ‘सतेज पाटील व पी. एन. या दोघांचेही समर्थक’ अशी त्यांची ओळख आहे शिवाय अश्विनी रामाणे या पी. एन. पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते रामचंद्र भोगम यांच्या कन्या आहेत. त्यामुळे पी. एन. यांचाही सन्मान केल्यासारखे होते शिवाय विधानपरिषदेच्या निवडणुकीतही स्वत: रामाणे यांची मदत महत्त्वाची ठरू शकते. या सगळ््या बाबींचा विचार होऊन त्यांनाच ही संधी दिली मिळणार असल्याचे चित्र पुढे आले आहे. दीपा मगदूम यादेखील दक्षिण विधानसभा मतदारसंघातीलच राजलक्ष्मीनगर प्रभागातूनच विजयी झाल्या आहेत. दिवंगत माजी महापौर दिलीप मगदूम यांच्या त्या पत्नी आहेत. ते देखील सतेज पाटील यांचे प्रमुख कार्यकर्ते होते. त्यामुळे आपल्याला ही संधी मिळावी, अशी मगदूम कुटुंबीयांची इच्छा होती; परंतु त्यांना नंतर काही महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते.प्रल्हाद चव्हाण नाराज; मुलाखतीवेळी गैरहजरकॉँग्रेस कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या. त्यावेळी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण उपस्थित नव्हते. त्याबाबत चौकशी केली असता समजले की, इच्छुकांच्या मुलाखती पी. एन. पाटील व सतेज पाटील हे दोघेच घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून सतेज पाटील यांच्यासोबत असतानाही ऐन मुलाखतीवेळी टाळण्यात आल्याने ते नाराज झाले. ते काँग्रेस कार्यालयाकडे आलेही नाहीत. विशेष म्हणजे त्यांचे पुत्र सचिन चव्हाण हे मुलाखती संपल्यावर आले, तर नगरसेविका जयश्री चव्हाण या आल्याच नाहीत.शमा मुल्ला उपमहापौरपदीकाँग्रेसकडे महापौरपद असल्याने उपमहापौरपद राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला यांना देण्यात येणार आहेत. त्यांच्या नावावर शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांचा उपमहापौरपदाचा अर्ज आज, मंगळवारी भरण्यात येणार आहे.सुनील पाटील राष्ट्रवादीचे गटनेतेराष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी जरगनगर प्रभागातून विजयी झालेले सुनील सावजी पाटील यांची निवड करण्यात आली. महापौर व उपमहापौरपदाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजप-ताराराणी आघाडी यांची संयुक्त बैठक आज, मंगळवारी दुपारी दोन वाजता होणार आहे. बैठकीस पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक, स्वरूप महाडिक, सुनील मोदी उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येईल.
अश्विनी रामाणे होणार नव्या महापौर !
By admin | Published: November 10, 2015 12:30 AM