कोल्हापूर : घरफाळा विभागातील घोटाळ्यावर वेगवेगळे चार मतप्रवाह निर्माण होऊन प्रत्येकाने आपापला मुद्दाच रेटण्याचा प्रयत्न केल्यामुळे महानगरपालिकेत सोमवारी झालेल्या बैठकीत चर्चेचाच घोटाळा झाला. कोणी कोणता मुद्दा मांडावा याचे काहीच ठरले नव्हते. प्रत्येक जण आपापल्या मुद्द्यावर अडून बसले. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे बैठक निष्फळ ठरली.
महानगरपालिका स्थायी समिती सभागृहात अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी घरफाळा घोटाळ्यासंबंधीच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी कोल्हापूर शहर नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, अशोक पोवार, अनिल कदम, ई-वार्ड संघर्ष समितीचे बाबा कदम, दुर्गेश लिंग्रस, अनिल घाडगे, दिलीप देसाई यांना चर्चेस बोलविले होते. बैठकीस माजी उपमहापौर भूपाल शेटे व माजी नगरसेवक सत्यजित कदमदेखील आले होते.
घरफाळा विभागातील घोटाळ्यावर सर्वांमध्ये एकवाक्यतेचा अभाव दिसून आला. इंदूलकर, देसाई यांनी मुळात २०१२ मध्ये घरफाळ्याची आकारणी चुकीच्या सूत्रावर झाल्याचा आक्षेप घेतला. त्याला शासनाची मान्यता घेतली नसल्याचा दावा त्यांनी केला. या मुद्द्यावर ते अडून बसले. अशोक पोवार, रमेश मोरे यांनी गेल्या काही दिवसांपासून आलेल्या तक्रारींवर काय कारवाई केली, त्याचा खुलासा करण्याचा आग्रह धरला. सत्यजित कदम यांनी सयाजी हॉटेलचा मुद्दा ताणून धरला. भूपाल शेटे यांनी पंधरा कोटींचे नुकसान केलेल्यावर जबाबदारी निश्चित केल्यावरही कारवाई का केली नाही, हा मुद्दा वारंवार मांडला. एवढेच झाले नाही तर प्रत्येक जण एकमेकांना रोखून आपलाच विषय आग्रहाने मांडत राहिला.
शेटे यांनी बैठकीत आक्रमक भूमिका घेताच काही त्यांना सतत रोखण्याचाही प्रयत्न केला. वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा भरकटल्याचे लक्षात येताच प्रा. जयंत पाटील यांनी हस्तक्षेप करून सगळ्या तक्रारींची नोंद घ्या, प्रत्येक तक्रारींवर प्रशासनाने काय कारवाई केली, याची माहिती दहा दिवसांनी पुन्हा एकदा बैठक घेऊन सर्वांना द्यावी, अशी सूचना केली. त्यास अतिरिक्त आयुक्त देसाई यांनी होकार दिला आणि दीड तास ताणलेली बैठक कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय संपविली.
‘त्या’ अधिकाऱ्याचे नाव जाहीर करा-
पंधरा कोटींचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी झाली, त्याच्यावर जबाबदारी निश्चित झाली. त्याचे नाव जाहीर करा. चोर सोडून दुसऱ्यांनाच अडकविण्याचा प्रयत्न होत आहे, असा आक्षेप आग्रह शेटे यांनी बैठकीत घेतला; परंतु चौकशी सुरू असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी त्याचे नाव सांगण्यास बगल दिली.
लेखापरीक्षक झाेपले होते का? -
सन २०१५ पर्यंत महापालिका घरफाळा विभागाचे जनरल ऑडिट झाले असल्याची माहिती सहायक आयुक्त औंधकर यांनी सांगताच दिलीप देसाई यांनी मग पालिकेचे लेखापरीक्षक झोपले होते का? असा सवाल केला.