कोल्हापूर : फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने बालगोपाल तालीम मंडळावर अटीतटीच्या लढतीत ३-२ अशी मात करीत अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. शाहू स्टेडियम येथे रविवारी फुलेवाडी व बालगोपाल संघ यांच्यात अंतिम सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून फुलेवाडी संघाकडून मंगेश दिवसे, करण चव्हाण-बंदरे, निखिल जाधव यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. आठव्या मिनिटास मंगेश दिवसेने करण चव्हाण-बंदरेच्या पासवर गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. सामन्यात बरोबरी करण्यासाठी ‘बालगोपाल’कडून आकाश भोसले, रोहित कुरणे, ऋतुराज पाटील, बबलू नाईक यांनी जोरदार प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश आले. ३१ व्या मिनिटास मिळालेल्या फ्री कीकवर महादेव तलवारने गोल करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. उत्तरार्धात फुलेवाडी संघाकडून आक्रमक व वेगवान चाली रचण्यास प्रारंभ झाला. ४३ व्या मिनिटास फुलेवाडीच्या निखिल जाधवने आऊटवर ‘बालगोपाल’च्या पेनल्टी क्षेत्रात केलेला थ्रो ‘बालगोपाल’च्या बचावपटूला घासून चेंडू गोलजाळ्यात गेला. त्यामुळे स्वयंगोल झाल्याने २-१ अशी सामन्यात आघाडी घेतली. सामन्यात कपिल साठे, करण चव्हाण बंदरे यांनी अनेक उत्कृष्ट चढायांचे प्रदर्शन केले. ७५ व्या मिनिटास फुलेवाडीच्या माणिक पाटीलने मिळालेल्या संधीवर उत्कृष्ट गोलची नोंद करीत सामन्यात ३-१ अशी भक्कम आघाडी संघास मिळवून दिली. जादा वेळेत ‘बालगोपाल’कडून सूरज जाधवच्या पासवर आकाश भोसलेने गोल करीत ३-२ अशी आघाडी कमी करीत रंगत निर्माण केली; पण बरोबरी साधता आली नाही. अखेर सामना फुलेवाडी संघाने ३-२ असा जिंकत ‘अस्मिता चषका’वर नाव कोरले. विजेत्या फुलेवाडी संघास ३० हजार रोख व चषक, तर उपविजेत्या बालगोपाल संघास २० हजार व चषक प्रदान करण्यात आला. बक्षीस समारंभावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, युवराज मालोजीराजे, पोलीस उपअधीक्षक यशवंत केडगे, बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील, पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, माजी नगरसेवक बबनराव कोराणे, के.एस.ए. सचिव माणिक मंडलिक, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, अजित खराडे, लालासाो गायकवाड, संभाजीराव मांगोरे-पाटील, बाळासाहेब निचिते, आदी उपस्थित होते. विजय साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेतील उत्कृष्टशिस्तबद्ध संघ - प्रॅक्टिस क्लब (अ)बचावपटू - महादेव तलवार (बालगोपाल)आघाडीवीर - करण चव्हाण-बंदरेहाफ - तेजस शिंदे गोलरक्षक - निखिल खाडेमालिकावीर - माणिक पाटील (चौघेही फुलेवाडी)
अस्मिता चषक ‘फुलेवाडी’कडे
By admin | Published: March 07, 2016 1:12 AM