कोल्हापूर : सोनतळी (रजपूतवाडी, ता. करवीर) येथील स्काऊट बंगल्यात चोरी करण्यासाठी आलेल्या आसाम येथील चोरट्यास प्रभारी केंद्रप्रमुखांच्या दक्षतेने रंगेहात पकडले. प्रतुल सोबेन स्वरगीयारी (वय २१, रा. ग्रामसुकमारी, पो. हजीरागाव, जि. बराक, राज्य आसाम) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोनतळी येथील स्काऊट बंगला हा विविध कॅम्पसाठी देण्यात येतो. सध्या येथे कोणताही कॅम्प सुरू नसल्याने तो बंगला रिकामा आहे. त्या बंगल्याची देखभाल करण्याची जबाबदार प्रभारी केंद्रप्रमुख मोहन अंबाचरण चौरासीया (वय ४०, रा. स्काऊट बंगला, सोनतळी, रजपूतवाडी) यांच्याकडे आहे. त्यामुळे ते तेथेच राहतात. रविवारी मध्यरात्रीच्यासुमारास चौरासीया हे झोपले असताना, अचानक हॉलमधील किचनमध्ये काही तरी भांडी पडल्याचा आवाज झाला. त्यामुळे चौरासीया उठून किचनमध्ये गेले असता त्यांना चोरटा काही तरी चोरी करत असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने किचनरुमचा दरवाजा बंद करून त्याला बाहेरुन कडी लावली. त्यानंतर करवीर पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. पोलिसांनी तातडीने येऊन त्या चोरट्यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने आपले नाव प्रतुल स्वरगीयारी असे सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी संपूर्ण बंगल्याची पाहणी केली असता, स्वरगीयारी या चोरट्याने स्काऊट बंगल्याला बाहेरुन भिंतीला शिडी लावून त्याद्वारे बंगल्यात प्रवेश केल्याचे निदर्शनास आले.
फोटो नं. ०८०२२०२१-कोल-प्रतुल स्वरगीयारी (आरोपी)