आजरा : वरिष्ठांशी गैरवर्तणूक करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी मडिलगे (ता. आजरा) येथील वनरक्षक संगीता बाबू राठोड यांना शासनसेवेतून निलंबित केले आहे. याबाबतचे पत्र शिस्तभंगविषयक प्राधिकारी तथा उपवनसंरक्षक एम. एन. मोहिते यांनी दिले आहे. शिस्तभंगाची कारवाई करीत वनरक्षकाला निलंबित केल्याने जिल्ह्यातील वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.
आजरा वनपरिक्षेत्रातील मडिलगेच्या वनरक्षक संगीता राठोड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक करणे, त्यांना मारहाण करणे यासह अन्य कारणांबाबत वरिष्ठांकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. वनविभागाचे शिस्तभंगविषयक अधिकारी तथा उपवन संरक्षक एम. एन. मोहिते यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. चौकशीत वरिष्ठांशी गैरवर्तणूक करून त्यांना मारहाण करणे, त्यांचा एकेरी उल्लेख करणे, अपमानास्पद बोलणे, जंगली जनावरांनी केलेल्या पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी करणे तसेच पीक नुकसानीच्या प्रकरणातील जीपीएस रिडिंग व पीक नुकसानीच्या क्षेत्राची मोजमापे ही सारख्याच प्रमाणात असून, अशी गंभीर गैरकृत्ये केली आहेत.
या सर्व बेशिस्त वर्तणुकीमुळे तसेच त्या गेली पाच वर्षे एकाच नियत क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांनी केलेल्या सर्व कामांची तपासणी करणे आवश्यक असल्याने त्यांना शासन सेवेतून निलंबित केले आहे, असेही पत्रात नमूद केले आहे. निलंबनाच्या कालावधीत संगीता राठोड यांनी परिक्षेत्र अधिकारी, गगनबावडा येथे हजर राहण्याचे असून, पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडायचे नाही, असेही पत्रात नमूद केले आहे.