कोल्हापूर : विधानसभा मतदान आणि मतमोजणी दिवशी होणाऱ्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. दि. २० ते २२ आॅक्टोबर दरम्यानच्या परीक्षांचा त्यामध्ये समावेश आहे. याबाबतची सूचना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील संलग्नित महाविद्यालयांना करण्यात येणार आहे.विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्रातील (प्रथम सत्र) परीक्षांचा प्रारंभ आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होणार आहे. त्याचे वेळापत्रक परीक्षा व मूल्यमापन मंडळाने आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले. त्यानुसार बी. ए., बी. कॉम. आणि बी. एस्सी., एम. ए., एम. कॉम. आणि एम. एस्सी., बी. व्होक. पदवी, पदविका अभ्यासक्रमांच्या विविध सत्रांच्या एकूण ५९१ परीक्षा आॅक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत; मात्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक गेल्या आठवड्यात जाहीर आहे.
त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणीच्या तारखा लक्षात घेऊन त्या दरम्यानच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. ज्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यातील या दिवशीचे पेपर त्या परीक्षांच्या अखेरीस घेतले जाणार आहेत.
या दिवशी परीक्षा नाहीतविधानसभा निवडणुकीच्या मतदान, मतमोजणी आणि दि. ९, १०, १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी होणारी स्वयंम् परीक्षा, १८ नोव्हेंबर रोजी विद्यापीठ वर्धापनदिन, दि. २ आणि ९ नोव्हेंबर रोजी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (राज्यसेवा), भारतीय कंपनी सचिव संस्थानतर्फे आयोजित कंपनी सेक्रेटरीजची परीक्षा दि. २८ व २९ डिसेंबर या दिवशी असल्याने संबंधित दिवशी विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या नाहीत.
विद्यापीठ आणि परिक्षेत्रातील महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विधानसभा निवडणुकीकरिता मतदान अधिकारी म्हणून निवडणूक आयोगाकडून नियुक्ती केली जाते. या नियुक्त केलेल्या मतदान अधिकाऱ्यांना मतदानाच्या एक दिवस अगोदर, मतदान तारीख आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या मूळ आस्थापनेवर हजर राहता येत नाही; त्यामुळे दि. २०, २१ आणि २२ आॅक्टोबर रोजी परीक्षा आयोजित करणे संयुक्तिक होणार नाही; त्यामुळे या कालावधीतील परीक्षा विद्यापीठाने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दि. २३ आॅक्टोबरला परीक्षा होईल. दिवाळीच्या सुटीमुळे दि. २४ ते ३० आॅक्टोबर दरम्यान परीक्षा होणार नाही.- डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू