कागल : कागल नगरपालिका निवडणुकीत आमचा अवघा एकशे चार मतांनी पराभव झाला. माझा राजकीय अनुभव कमी पडला, म्हणून हा पराभव झाला, हे मी जाहीरपणे कबूल करतो. पण आता चित्र बदलले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे. कोणते नेते, राजकीय गट आमच्यासोबत राहणार? हे मला माहीत नाही. कोणाचं काय ठरलंय? याचीही माहिती नाही. पण विधानसभा निवडणुकीसाठी कागलमध्ये जनतेचं आणि आमचं ठरलंय... असे प्रतिपादन पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.
कागल शहरातील दिव्यांगांच्या आणि संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या वतीने दिव्यांगांसाठी केलेल्या पूरक कामाबद्दल समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील होते. येथील जयसिंगराव घाटगे चौकात झालेल्या या कार्यक्रमास शाहू साखर कारखान्याचे संचालक बॉबी माने, रमेश सणगर, भाजप शहराध्यक्ष अरूण सोनुले, नंदू माळकर, पालिका गटनेत्या दीपाली भुरले, माधवी मोरबाळे, एस. डी. पाटील, अरुण गुरव, उमेश सावंत, पप्पू कुंभार, किरण मुळीक, आदी उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल पोवार यांच्या वाढदिवसानिमित्त घाटगे यांच्या हस्ते केक कापून सत्कार करण्यात आला.
स्वागत प्रास्ताविक भाजप दिव्यांग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संतोष मिसाळ यांनी केले. यावेळी प्रवीण गुरव, विशाल पाटील मळगेकर, प्रवीण कदम, राजेंद्र जाधव, बाळासाहेब हेगडे यांनी आक्रमक राजकीय भाषणे करीत टीकाटिप्पणी केली. तर संतोष निंबाळकर, तुकाराम नलवडे या दिव्यांगांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बाळासाहेब मालुमल यांनी, तर आभार सुनील कालेकर यांनी मानले.घाटगे यांचा नगरपालिकेवर आरोपसमरजितसिंह घाटगे म्हणाले की, वड्डवाडी येथील ४२ लोकांनी माझी भेट घेतल्यानंतर त्यांच्या घरांच्या कामासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला. पण जिल्हाधिकारी यांचा आदेशही नगरपालिकेने अडवून ठेवला आहे. राजकीय हेतूने सामान्य माणसाला हे लोक वेठीस धरत आहेत. माझ्या निम्म्या जागांवर आरक्षण टाकले जात आहे. त्यांना मी घाबरणार नाही. या आधी मी तुमच्या विरोधात एकटा बोलत होतो. आता आमचे कार्यकर्ते आणि सामान्य लोकही बोलत आहेत.