संतोष मिठारीकोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि दिवाळीच्या काळात अर्थचक्राने गती घेतल्याने मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहारदेखील वाढले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा व्यवहार वाढले. मार्चअखेर कोल्हापूरमध्ये एकूण ७६०६३ दस्तांची नोंदणी झाली. त्यातून २९३ कोटी ६१ लाख रुपयांचा महसूल जमा झाला. गेल्या १५ दिवसांत मालमत्ता खरेदी-विक्रीच्या १६०० दस्तांची नोंद झाली आहे.
मुद्रांक शुल्कातील सवलती, जाचक अटींतील सुधारणांनी ग्राहकांकडून घरांना मागणी वाढली आहे. गेल्या दीड वर्षापासूनचे असलेले कोरोनाचे मळभ बाजूला सारून कोल्हापुरातील रियल इस्टेट क्षेत्राचा वेग वाढला. डिझेल दरवाढीने बांधकाम साहित्याचे दर वाढले. यावर्षी घरांच्या किमती दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे आपल्या आर्थिक बजेटनुसार वन, टू, थ्री बीएचके, रो बंगलो, रो-हाऊस आदींमधील पर्यायांची ग्राहकांनी निवड केली. त्यांना बँकांच्या व्याजदरातील कपातीचा दिलासा मिळाला. मागणी वाढल्याने रियल इस्टेट क्षेत्रातील उत्साह वाढला. गणेशोत्सव, दसरा-दिवाळी या सणांतील मुहूर्तावर अनेकांनी कोल्हापुरातील आपले गृहस्वप्न साकारले, तर प्लॉट खरेदी केली.
मालमत्ता खरेदी-विक्री - वर्ष दस्त नोंदणीची संख्या (हजारात)
मार्च २०१९ ७२७५५
मार्च २०२० ६६९३३
मार्च २०२१ ७६०६३
२९३ कोटींचा महसूल
- मार्च २०१९ मध्ये दस्त नोंदणीतून जिल्ह्यात ३०० कोटी ३५ लाखांचा महसूल जमा झाला.- सन २०२० मध्ये २९२ कोटी ९७ लाख, तर यंदा मार्चअखेर २९३ कोटी ६१ लाख रुपये इतका महसूल राज्य शासनाकडे जमा झाला आहे.
टू-बीएचकेला पसंती
कोरोनामुळे लोकांना स्वत:च्या घराचे महत्त्व पटले. त्यामुळे गणेशोत्सव, दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकांनी घरासाठी नोंदणी केली. त्यात टू, थ्री, फोर बीएचके प्रिमियम फ्लॅटला ग्राहकांची चांगली पसंती राहिली असल्याचे सचिन ओसवाल यांनी सांगितले.
गेल्या वर्षीपेक्षा चांगले चित्र
कोरोनामुळे गेल्यावर्षी दस्तनोंदणीचे प्रमाण कमी होते. त्याच्या तुलनेत यावर्षी चांगले चित्र आहे. सदनिका, प्लॉट, आदी स्वरूपातील मालमत्ता खरेदी होत आहे. दिवाळीच्या काळात गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात मालमत्ता खरेदी-विक्रीचे १६०० व्यवहार झाले आहेत, अशी माहिती प्रभारी दुय्यम निबंधक (करवीर क्रमांक तीन) बी. के. पाटील यांनी बुधवारी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दस्त नोंदणी होऊ लागली आहे. त्याची गती आणखी वाढणे अपेक्षित आहे. -मल्लिकार्जुन माने, मुद्रांक जिल्हा अधिकारी