कोल्हापूर : एएस ट्रेडर्स कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला मुख्य सूत्रधार लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (रा. पलूस, जि. सांगली) याच्याकडून पोलिसांनी सुमारे ६४ लाखांची मालमत्ता जप्त केली. यात सोन्याच्या अंगठ्या आणि कारचाही समावेश आहे. त्याच्या पत्नीकडून ५० लाखांचे दागिने हस्तगत केल्याची माहिती तपास अधिकारी निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार याच्या अटकेनंतर मोठी रक्कम आणि त्याची मालमत्ता पोलिसांच्या हाती लागेल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, अटकेतील लोहितसिंगकडून पोलिसांनी केवळ ६४ लाखांची मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. यात त्याचे सात तोळ्यांचे ब्रेसलेट, दोन अंगठ्या, पुण्यातील बंगल्यातून जप्त केलेला चांदीचा गणपती, देव्हाऱ्याची प्रभावळ, चांदीचे दागिने, बँकांचे पासबुक, महागडी घड्याळे, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले.
२० लाखांची कार सोडली पार्किंगमध्येशाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच लोहितसिंग सुभेदार बेंगळुरूमधून विमानाने पळून गेला. त्यावेळी त्याने २० लाखांची कार विमानतळाच्या पार्किंगमध्येच लावली होती. तपासादरम्यान पोलिसांनी कार जप्त केली.