सूर्यग्रहण पाहण्यासाठी कोल्हापुरातील खगोलप्रेमी केरळला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 03:15 AM2019-12-25T03:15:40+5:302019-12-25T03:16:13+5:30
चिल्लर पार्टीचा समावेश : शिवाजी विद्यापीठातही खंडग्रास ग्रहण पाहण्याची संधी उपलब्ध
संदीप आडनाईक
कोल्हापूर : कंकणाकृती सूर्यग्रहण गुरुवारी सकाळी देशभरात नऊ वर्षांनी दिसणार आहे. ते पाहण्यासाठी येथील खगोलप्रेमी थेट केरळकडे रवाना झाले आहेत. केरळजवळील कासारगोडजवळ हे सूर्यग्रहण पाहणार आहेत. कुतूहल फौंडेशन, चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ, मुंबईच्या खगोल मंडळामार्फत डॉ. राजेंद्र भस्मे आणि त्यांचे सहा सहकारी तसेच किरण गवळी यांचा समूहही शक्तिशाली दुर्बिणीसह केरळकडे रवाना झाले आहेत. खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी शिवाजी विद्यापीठानेही व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
खास चष्मे
नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी डोळ्यांच्या सुरक्षेचा विचार करून वैज्ञानिक पद्धतीने खास चष्मे बनविले आहेत. शिवाजी विद्यापीठातून ग्रहण पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोल्हापुरातील कुतूहल फौंडेशनचे खगोलप्रेमी काही शक्तिशाली दुर्बिणींसह कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्यासाठी मंगळवारी दुपारी केरळकडे रवाना झाले.
ग्रहणाची सुरुवात सकाळी ८ वाजून ०४ मिनिटांनी होईल. चंद्राची सावली वरच्या बाजूने सूर्यावर पडण्यास सुरुवात होईल आणि हळूहळू खाली सरकेल. सूर्य झाकला जाईल तसतसा अंधार जाणवेल. सकाळी ९.२३ वाजता ८३.५७ टक्के सूर्यबिंब झाकले जाईल. सावली खाली सरकत असताना थोडी उजवीकडे सरकेल आणि १०.५९ वाजता ग्रहण संपेल. ९.२३ नंतर थोडा-थोडा प्रकाश वाढण्यास सुरुवात होईल व १०.५९ नंतर दिवस पूर्ववत होईल.
- प्रा. डॉ. अविराज जत्राटकर