कंकणाकृती सूर्यग्रहणासाठी कोल्हापुरातील खगोलप्रेमी केरळकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 02:54 PM2019-12-25T14:54:11+5:302019-12-25T16:06:10+5:30

कंकणाकृती सूर्यग्रहण उद्या, गुरुवारी सकाळी दिसणार आहे. यापुढील अशी संधी नऊ वर्षांनीच मिळणार असल्यामुळे कोल्हापुरातील खगोलप्रेमी या वर्षीचे सूर्यग्रहण पाहण्यासाठी थेट केरळकडे रवाना झाले आहेत.

Astronomers from Kolhapur leave for Kerala for a solar eclipse | कंकणाकृती सूर्यग्रहणासाठी कोल्हापुरातील खगोलप्रेमी केरळकडे रवाना

 कोल्हापुरातील खगोलप्रेमी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्यासाठी केरळकडे रवाना झाले.

googlenewsNext
ठळक मुद्देकुतूहल फौंडेशन, चिल्लर पार्टीचा समावेश शिवाजी विद्यापीठात खंडग्रास पाहण्याची संधी

संदीप आडनाईक 

कोल्हापूर : कंकणाकृती सूर्यग्रहण उद्या, गुरुवारी सकाळी दिसणार आहे. यापुढील अशी संधी नऊ वर्षांनीच मिळणार असल्यामुळे कोल्हापुरातील खगोलप्रेमी या वर्षीचे सूर्यग्रहण पाहण्यासाठी थेट केरळकडे रवाना झाले आहेत.

कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची ही अनोखी संधी आहे. यासाठी कोल्हापुरातील कुतूहल फौंडेशन, चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ, मुंबईच्या खगोल मंडळामार्फत डॉ. राजेंद्र भस्मे आणि त्यांचे सहा सहकारी तसेच किरण गवळी यांचा समूहही शक्तिशाली दुर्बिणीसह केरळकडे रवाना झाला आहे. याशिवाय खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी शिवाजी विद्यापीठानेही व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

कुतूहल फौंडेशनतर्फे खास चष्मे

कोल्हापुरातील कुतूहल फौंडेशनतर्फे सूर्यग्रहणाचा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी डोळ्यांच्या सुरक्षेचा विचार करून वैज्ञानिक पद्धतीने खास चष्मे बनविले आहेत. याशिवाय चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत २४ जणांचा समूह केरळमधील कुन्नूरजवळ सूर्यग्रहण पाहणार आहे. मुंबईच्या खगोल मंडळामार्फत डॉ. राजेंद्र भस्मे आणि समूह केरळजवळील कासारगोडजवळ हे सूर्यग्रहण पाहणार आहेत.

शिवाजी विद्यापीठातून ग्रहण पाहण्याची संधी

शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राच्या वतीने स्कूल आॅफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी अधिविभागाच्या छतावरून सूर्यग्रहण पाहण्याची व निरीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी शास्त्रीयदृष्ट्या सूर्यग्रहण कसे पाहावे याचेसुद्धा मार्गदर्शन करण्यात येईल; तसेच नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल.

 

  • ठिकाण - कोल्हापूर जिल्हा
  • ग्रहण - कंकणाकृती सूर्यग्रहण
  • प्रारंभ - सकाळी ८.०४ वाजता
  • मध्य - सकाळी ९.२३ वाजता
  • समाप्ती- १०.५९ वाजता
  • एकूण ग्रहण कालावधी - २ तास ५६ मिनिटे


ग्रहणाची सुरुवात सकाळी ८.०४ मिनिटांनी होईल. चंद्राची सावली वरच्या बाजूने सूर्यावर पडण्यास सुरुवात होईल आणि हळूहळू खाली सरकेल. सूर्य झाकला जाईल तसतसा अंधार जाणवेल. सकाळी ९.२३ वाजता ८३.५७ टक्के सूर्यबिंब झाकले जाईल. सावली खाली सरकत असताना थोडी उजवीकडे सरकेल आणि १०.५९ वाजता ग्रहण संपेल. ९.२३ नंतर थोडा-थोडा प्रकाश वाढण्यास सुरुवात होईल व १०.५९ नंतर दिवस पूर्ववत होईल.
- प्रा. डॉ. अविराज जत्राटकर
यशवंतराव पाटील सायन्स कॉलेज, सोळांकूर


सूर्यग्रहण पाहताना विशिष्ट काळजी घ्यावी. थेट सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी किंवा दुर्बीण, भिंगे रंगीत किंवा काजळी लावलेले काचेचे तुकडे, एक्स-रे फिल्म, सीडी आणि गॉगल कॅमेरा, मोबाईल किंवा इतर उपकरणांमधून पाहू नये; कारण एकाग्र सौरकिरणांमुळे डोळ्यांचे नुकसान होईल आणि डोळ्याला गंभीर दुखापत किंवा कायमचे अंधत्व येऊ शकते. ग्रहण पाहण्याकरिता विशिष्ट कागदापासून तयार केलेले सूर्यग्रहण पाहण्याचे चष्मे किंवा फिल्टर वापरावेत. सूर्यग्रहण पाहण्यापूर्वी सूर्यग्रहण पाहण्याचे चष्मे किंवा फिल्टर यांची तपासणी करा आणि जर ते स्क्रॅच किंवा खराब झाले असेल तर फिल्टर वापरू नका.
- डॉ. राजीव व्हटकर
समन्वयक,
अवकाश संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ.

 

 

 

Web Title: Astronomers from Kolhapur leave for Kerala for a solar eclipse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.