कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय स्पेश स्टेशन काही मिनिटांकरिता आज, सोमवारी (दि. १४) ते २० डिसेंबर दरम्यान सर्वसामान्यांना डोळ्यांनी पाहण्याची संधी मिळणार आहे.
हे स्पेस सेंटर पृथ्वीभोवती ९० मिनिटांमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करते. त्याचा वेग एका तासाला १७ हजार ५०० मैल म्हणजे २८ हजार किलोमीटर एवढा असतो. स्पेस सेंटरवरती पडणाऱ्या सूर्याच्या प्रकाशाचे परावर्तन होत असल्याने हे स्पेस सेंटर पाहण्यास मिळते. हे बघत असताना विमान अथवा मोठा तारा आकाशामधून जात आहे असे दिसते. याची क्षितिजावरून असणारी उंची डिग्री अथवा इलेव्हेशनमध्ये मोजली जाते. आज सायंकाळी ६ वाजून २२ मिनिटांपासून पाच मिनिटांकरिता पश्चिम वायव्य दिशेकडे अकरा डिग्री उंचीवरून दक्षिण दिशेकडे १० डिग्री उंचीकडे जाणार आहे. गुरुवारी (दि. १७ ) सकाळी ६ वाजून ७ मिनिटांपासून सहा मिनिटांकरता दक्षिण नैऋत्य दिशेकडून १० डिग्री उंचीवरून पूर्व ईशान्य दिशेकडे जाणार आहे, तर शुक्रवारी (दि. १८) पहाटे ५ वाजून २० मिनिटांपासून एक मिनिटाकरिता १० डिग्री उंचीवरून दक्षिण आग्नेय दिशेकडून आग्नेय दिशेकडे १४ डिग्री उंचीवरून जाणार आहे. शनिवारी (दि. १९) पहाटे ६ वाजून ८ मिनिटांपासून सहा मिनिटांकरिता १० डिग्री उंचीवरून पश्चिम नैऋत्य दिशेकडून उत्तर ईशान्य दिशेकडे ११ डिग्री उंचीवरून जाणार आहे. रविवारी (दि. २०) पहाटे ५ वाजून २४ मिनिटांपासून ३ मिनिटांकरिता पूर्व आग्नेय दिशेकडून हे स्पेस सेंटर ११ डिग्री उंचीवरून ईशान्य दिशेकडे जाणार आहे. याचा लाभ खगोलप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन विवेकानंद काॅलेजचे पदार्थ व खगोलशास्त्र विभागप्रमुख डाॅ. मिलिंद कारंजकर यांनी केले आहे.