पन्हाळा : सिंह राशीमधून होणाऱ्या उल्कावर्षावाची अनुभूती पन्हाळगडावर रविवारी पहाटे खगोलप्रेमींनी घेतला. जेष्ठ खगोलशास्त्र अभ्यासक व संशोधक डॉ. आर.व्ही. भोसले आणि राजाराम महाविद्यालयातील प्राध्यापक अविराज जत्राटकर यांनी १२ इंची टेलिस्कोपद्वारे या उल्कावर्षाव पाहण्याचा दुर्मिळ योग खगोलप्रेमींसाठी आणला होता.पन्हाळा येथील पन्हाळा पब्लिक स्कूलच्या क्रीडांगणावर लावण्यात आलेल्या दुर्बिणीद्वारे हा उल्कावर्षाव अनुभवता आला. कोल्हापूरातील खगोलप्रेमी वसंतराव गुंडाळे यांनी स्वत: तयार केलेली ही १२ इंची दुर्बिण खगोलप्रेमींसाठी उपलब्ध होती. त्यांच्यामुळे हा अनोखा योग खगोलप्रेमींना अनुभवता आला.
आकाशात सिंह राशीतून उल्कावर्षाव होतांना पाहायला मिळत असताना रात्री १२ च्या सुमारास पूर्वक्षितिजावर सिंह रास उगवली. तेंव्हापासून ते पहाटे ४ पर्यंत हा वर्षाव सुरु होता. यावेळी तासाला १५ ते २० उल्का कोसळताना दिसल्या.पृथ्वी टेम्पल टटल या धूमकेतूचा मार्ग (कक्षा) ओलांडून जाणार असल्यामुळे हा उल्कावर्षाव घडतो. हा धूमकेतू दर ३३ वर्षांनी सूर्यमालेत येऊन सूयार्ला फेरी मारून जात असतो. त्यावेळी धुमकेतुमधील काही द्रव्य त्याच्या मार्गावर सांडत असते. त्याला अंतराळातील डेबरीज (कचरा) असे म्हणतात.
जेंव्हा पृथ्वी या भागातून पुढे जात असते तेंव्हा गुरुत्वाकर्षणामुळे हा कचरा पृथ्वीकडे खेचला जातो आणि वातावरणाशी घर्षण होऊन तो पेट घेतो, तेंव्हा आकाशात एक लखलखीत प्रकाश शलाका चमकून जाते. काहीवेळेला तर मोठे अग्निगोलसुद्धा दिसतात. त्यामुळे पृथ्वीवासीयांना नभांगणात नयनरम्य रोषणाई पाहायला मिळते. जणू आकाशाच्या अंगणात नक्षत्रांची दिवाळीच चालू आहे.धूमकेतूचा हा कचरा अंतराळात सिंहराशीच्या दिशेत असलेने या उल्का सिंह राशीतून पडत आहेत असे भासते. म्हणूनच या खगोलीय आविष्कारास लिओनीड्स- म्हणजे सिंह राशीतील उल्कावर्षाव असे म्हणतात. इतर राशिंमधूनही वर्षभरात लहान-मोठे वर्षाव होतच असतात. त्यांतील जेमिनिड, परसुअस त्यांप्रमानेच लिओनीड्स यांचे उल्कावर्षावर प्रेक्षणीय असतात.उल्कावर्षाव अनुभवणे ही खगोल प्रेमींसाठी जणू नैसर्गिक दिवाळीची पर्वणीच होती. या वेळी जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. आर. व्ही. भोसले यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की, उल्कावर्षाव होत असताना या उल्का जमिनीवर येत नाहीत तर उल्कांचा पुर्नजन्म होतो.
खगोल अभ्यासक प्रा. अविराज जत्राटकर यांनी दुर्बिणीचा उपयोग आणि उल्का वर्षावाची माहिती दिली. या उपक्रमासाठी राजाराम महाविद्यालयाचे सुमारे ५० विद्यार्थी तसेच परिसरातील खगोलप्रेमी सहभागी झाले होते.