बांबावडे : सोनवडे - बांबवडे (तालुका शाहूवाडी) येथील अथणी शुगर्सने डिसेंबरअखेरचे ऊस बिल प्रतिटन २,९०० रुपयेप्रमाणे जमा केले असून, आतापर्यंत दोन लाख ५२ हजार ५०० मेट्रिक टन गाळप पूर्ण केले आहे, अशी माहिती एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांनी दिली.
अथणी शुगर्सने डिसेंबरअखेर गाळपासाठी आलेल्या ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. तसेच सर्व ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांचेही डिसेंबर अखेरचे सर्व बिल अदा केलेले आहे. अथणी शुगर्सने ‘एफआरपी’पेक्षा ज्यादा दर देण्याची परंपरा कायम राखली आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज झाले पाहिजे. गळितासाठी आलेल्या सर्व ऊसाला चांगला दर मिळाला पाहिजे, अशी भूमिका अथणी शुगरचे अध्यक्ष नामदार श्रीमंत पाटील यांची आहे. ती जपण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. तसेच गाळपाला येणाऱ्या ऊसाला प्रतिटन एक किलो साखर देण्यात आली आहे.
उर्वरित गळीत हंगामात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन योगेश पाटील यांनी केले आहे. यावेळी उदय साखरचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, संचालक रणवीरसिंग गायकवाड, युनिट हेड रवींद्र देशमुख, शेती अधिकारी आनंदराव पाटील, चीफ इंजिनियर सर्जेराव पाटील, चीफ केमिस्ट प्रल्हाद पाटील, कार्यकारी संचालक भगवान पाटील, सुजय पाटील, दशरथ पवार उपस्थित होते.