कोल्हापूर : टोप संभापूर (ता. हातकणंगले) येथील १४ वर्षीय अथर्व गोंधळी २४० कि.मी. अंतर १२ तासांत सायकलिंगने पूर्ण करून जागतिक विश्वविक्रम करणार आहे. या उपक्रमाची सुरुवात शनिवारी सकाळी टोप येथून करणार आहे, अशी माहिती कोरगांवकर ट्रस्टचे अध्यक्ष अमोल कोरगांवकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोरगांवकर म्हणाले, अथर्व वयाच्या सातव्या वर्षापासून सायकलिंग करीत आहे. दोन वर्षांपूवी त्याने कराटेतील ब्लॅक बेल्टही घेतला आहे. तो रोज १७० कि.मी.चा सराव सायकलवरून करीत आहे. त्याने पन्हाळा, जोतिबा, कासेगाव, आष्टा, संकेश्वर, बेळगाव, कºहाड, आदी भागांत सायकलचा प्रवास करत ‘सायकल वापरा, शरीर तंदुरुस्त ठेवा’, निरोगी रहा, प्रदूषण टाळा, झाडे लावा पर्यावरण वाचवा, असा संदेश दिला होता. तो या विक्रमाची सुरुवात टोप ते तवंदी घाट-टोप, पुन्हा टोप ते तंवदी घाट आणि कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालय चौक असे २४० कि.मी. अंतर १२ तासांत पूर्ण करणार आहे. या जागतिक विक्रमाची नोंद घेण्यासाठी विश्वविक्रम निरीक्षक मनमोहन रावत उपस्थित राहणार आहेत. सध्या तो तायक्वाँदो प्रशिक्षक गजेंद्र हिरवे, आयर्नमॅन आकाश कोरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंगचा सराव करीत आहे.
पत्रकार परिषदेस डॉ. संदीप गोंधळी, डॉ. मनीषा गोंधळी, शंकर माळी, अण्णासाहेब माळी, काशिनाथ माळी, श्रीकांत गोंधळी, आकाश कोरगावकर, स्वाती गायकवाड साळुंखे, आदी उपस्थित होते.----------