चंदगड : कोवाड (ता. चंदगड) येथील आश्रमशाळेत एका अल्पवयीन मुलीवर शाळेतील विद्यार्थी, अधीक्षक व स्वयंपाकी अशा तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत चंदगड पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून, याप्रकरणी आश्रमशाळेचा अधीक्षक विश्वास नागोजी कांबळे (रा. नेसरी, ता. गडहिंग्लज) व स्वयंपाकी भरमा रामा डांगे (वय ३८, रा. तेऊरवाडी, ता. चंदगड) यांना अटक करण्यात आली. तर, अल्पवयीन मुलग्यास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत चंदगड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शासनमान्य असलेल्या कोवाडच्या आश्रमशाळेत कर्नाटकमधील एका जिल्ह्यातील एक गरीब विद्यार्थिनी इयत्ता सहावीमध्ये शिकते. या शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या एका मुलग्याने शनिवारी (दि. ४ फेब्रुवारी) शाळेच्या आवारातच तिच्यावर अत्याचार केला. यावेळी ही घटना शाळेमध्ये अधीक्षक असणाऱ्या विश्वास नागोजी कांबळे याने पाहिली. या विद्यार्थिनीचा गैरफायदा घेऊन कांबळे यानेही सोमवारी (दि. ६ फेब्रुवारी) रात्री अत्याचार केला. तसेच त्या शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करणारे भरमा रामा डांगे यानेही बुधवारी (दि. ८) रात्री साडेनऊ वाजता अत्याचार केला. मुलीला त्रास होत असल्याने याबाबतची माहिती घरच्यांना दिली. आई-वडिलांनी मुलीसह याबाबतची फिर्याद चंदगड पोलिस ठाण्यात दिली असता दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी गडहिंग्लजचे पोलिस निरीक्षक पी. एम. शेळके तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
कोवाड आश्रमशाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार
By admin | Published: February 23, 2017 12:51 AM