चंदगड :ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील एका विवाहित तरूणीकडून ६ लाख रूपये घेवून नोकरीचे व लग्नाचे आमिष दाखवून पीडीत तरूणींवर अत्याचार केल्याप्रकरणी अनिल जोतिबा तळगुळकर (वय ३२, रा. मांडेदुर्ग ) याच्यासह भरत सुबराब गावडे (वय ४२, रा. आसगाव), महेश शहापूरकर ( वय ३५, रा. मांडेदुर्ग), उदय संतू पाटील (वय २८, रा. बसर्गे), बाबू शहापूरकर (वय ३०, रा. मांडेदुर्ग), विश्वनाथ ओऊळकर (वय ३२, रा. गौळवाडी, सर्व ता. चंदगड) या सहा जणाविरूद्ध गडहिग्लज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.याप्रकरणातील अनिल जोतिबा तळगुळकर याच्यावर खंडणी व महिलेवर अत्याचार असे दोन गुन्हे दाखल असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित ५ संशयित आरोपी फरार आहेत.पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणी ही पोलिस भरतीच्या इच्छेने फाट्यावरील एका अॅकॅडमीत शिकत होती. त्यावेळी तुला नोकरी लावतो म्हणून पीडीत तरुणीकडून अनिल तळगुळकर व महेश शहापूरकर यांनी ६ लाख रुपये घेतले. अनिलने लग्नाचे अमिष दाखवून पीडीतेवर अनेकदा तिच्यावर अत्याचार केले.दरम्यान, नोकरीसाठी दिलेले पैसे पीडीत तरूणीने परत मागितल्यानंतर अनिलने ते पैसे परत न देता पीडीत तरूणीला मारहाण करून तिच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकीही दिली. याबाबत पोलिसात तक्रार करण्यास गेले असता भरत गावडे (रा. आसगाव), बाबू शहापूरकर व महेश शहापूरकर (रा. मांडेदुर्ग), विश्वनाथ ओऊळकर व उदय पाटील यांनीही तक्रार मागे घेण्यासाठी धमकावल्याचे पीडीतिने म्हटले आहे.
त्यानंतर या तरुणीने या ६ जणाविरूद्ध गडहिंग्लज पोलिसात फिर्याद दिली. संबंधित संशयित आरोपींविरूद्ध विविध कलमाखाली गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास चंदगड पोलिस करीत आहेत.