कोवाड : येथील भीमसेन गणपती चव्हाण यांच्या घरी प्रार्थना करणाऱ्या ४० जणांवर अनोळखी १० ते १५ जणांनी लोखंडी गज, जांबियाने अचानक हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये परिसरातील १२ जण जखमी झाले, तर कारसह तीन मोटारसायकली व घरातील प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे. दुपारी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली.पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोवाड येथील सामाजिक कार्यकर्ते भीमसेन चव्हाण यांच्या घरी दर रविवारी परिसरातील काही लोक प्रार्थनेसाठी एकत्र येतात. रविवारी दुपारी तीन-चार कारमधून आलेल्या अज्ञात १० ते १५ जणांनी चव्हाण यांच्या घरात अचानक प्रार्थना करणाºयांवर हल्ला केला. या हल्ल्यात स्वाती भीमसेन चव्हाण, विठ्ठल बाबू जाधव, मंगल बाबू बागडी, सचिन पांडुरंग बागडी, सचिन विठ्ठल पाटील (सर्व रा. कोवाड), अर्जुन सुबराव मुतकेकर, मंजूषा अर्जुन मुतकेकर, रेणुका हणमंत जोशी (रा. कालकुंद्री), मारुती पाटील (रा. चिंचणे), अशोक शिवाजी माने (रा. तेऊरवाडी) यांच्यासह तळगुळी व दिंडलकोप गावातील प्रत्येकी एक मिळून १२ जण जखमी झाले आहेत.घरातील लोकांनी आरडाओरडा केला, त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु त्यांनाही दमदाटी करत हल्लेखोर बेळगावच्या दिशेने पसार झाले.हल्लेखोरांची घोषणाबाजी !कोवाड येथील प्रार्थनास्थळातील लोकांवर हल्ला करून परत जाताना हल्लेखोर ‘जय भवानी.. जय शिवाजी’च्या घोषणा देत होते. कोवाड येथून दुंडगे-कुदनूर मार्गे बेळगावच्या दिशेने परत जाताना त्यांनी वाटेत भेटलेल्या तळगुळी व दिंडलकोप येथील काही लोकांवरही हल्ला केल्याची चर्चा आहे.पूर्वनियोजित हल्लाचव्हाण यांचे घर कोवाड-दुंडगे मार्गावर आहे. त्यामुळे हल्लेखोरांनी त्या घरापासून काही अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाकडे आणि दगड ठेवून या मार्गावरील वाहतूक बंद केली होती. चेहºयावर काळे कापड बांधून आलेल्या हल्लेखोरांनी हल्ल्यानंतर त्याच दुचाकीवरून पलायन केले.
कोवाडला उपासना स्थळावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:53 AM