कुंडल : येथील अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचे पडसाद मंगळवारी दिवसभर उमटले. संशयित सचिन पाटोळे यास पोलिसांनी अटक करूनही ग्रामस्थांनी त्याच्या कुटुंबास गावातून हाकलून लावावे, या मागणीसाठी पाटोळेच्या घरावर दगडफेक केली, वाहने पेटवून दिली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी लाठीमार करून जमावास पांगविले. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. स्थानिक पोलिस बंदोबस्तासह एसआरपीचे जवान तैनात केले आहेत.दोन दिवसांपूर्वी एका नऊ वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. ही घटना सोमवारी उघडकीस आली. ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध करून संशयितांना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. गाव बंद ठेवून तासगाव-कऱ्हाड मार्गावर रास्ता रोको केला होता. ठिकठिकाणी टायर पेटविल्या होत्या. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी तातडीने संशयित सचिन पाटोळे (वय २५, रा. कुंडल बसस्थानकामागे) यास वेजेगाव (ता. खानापूर) येथे अटक केली होती. तरीही या घटनेचे मंगळवारी तीव्र पडसाद उमटले. ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन ग्रामसभा घेतली. या सभेत पुन्हा घटनेचा निषेध केला. अशाप्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीस आळा घालावा, अतिक्रमण व तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करावी, या मागणीचे ठराव करण्यात आले. यावेळी क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड, जिल्हा बॅँकेचे संचालक महेंद्र लाड, पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद लाड, सरपंच सुलोचना कुंभार, आदी उपस्थित होते. ग्रामसभेत शांततेचे आवाहन केले होते. तरीही ग्रामसभा झाल्यानंतर काही जमाव अटकेतील संशयित पाटोळे राहत असलेल्या बसस्थानकाजवळील नाईकवाडा परिसरात गेला. याठिकाणी संशयिताचे नातेवाईक व काही समर्थक उभे होते. हा गट व ग्रामस्थांचा गट आमने-सामने आल्यानंतर प्रचंड तणाव निर्माण झाला. दोन्ही गट भिडल्याने त्यांच्यात दगडफेक सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. जमाव ऐकत नसल्याचे लक्षात येताच पोलिसांनी लाठीमार केला. दगडफेकीत ग्रामस्थ व काही पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी गावात संचलन सुरू केले. रस्त्यावर फिरणाऱ्यांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केल्यानंतर जमाव रस्त्यावरून गायब झाला. (वार्ताहर)पोलिसांचा लाठीमार : एसआरपीचे जवान दाखलकुंडलमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे समजताच जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णकांत उपाध्याय हे दाखल झाले. राज्य राखीव दलाच्या (एसआरपी) जवानांना पाचारण करण्यात आले. हुल्लडबाजी करणाऱ्यांची धरपकड सुरू ठेवण्यात आली. दुपारनंतर गावातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता.जमावाचा रास्ता रोको : दगडफेकीनंतर जमावाने अचानक कुंडल फाट्यावर रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक नेते व पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. संशयितास अटक केली आहे, याचा तपास सुरू आहे, आणखी कोणाचा सहभाग असेल तर त्यालाही अटक केली जाईल, असे त्यांनी सांगितले. दहा जखमी : जमावाने तीन दुचाकी पेटविल्या. घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे मोबाईल काढून घेऊन फोडण्यात आले. दगडफेकीमुळे दहा ते बाराजण जखमी झाले. यात पोलिसांचाही समावेश आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
संशयिताच्या घरावर हल्ला
By admin | Published: September 14, 2016 12:27 AM