कोल्हापूर : कळंबा कारागृहात मोका कारवाईतील न्यायालयीन बंदी व वाॅर्डर यांच्यातील वाद सोडविण्यास गेलेल्या कारागृह पोलिसास धक्काबुक्कीचा प्रकार सोमवारी घडला. याबाबत अरुण लक्ष्मण बोराडे (रा. कळंबा कारागृह पोलीस लाईन) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आठ बंदीजनांवर मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला. सूरज ऊर्फ सोन्या प्रकाश माने, वैभव व्यंकट नागझरकर, अक्षय मच्छिंद्र हाके, आकाश मारुती शैलार, जीवन अंगदराव सातपुते, अक्षय सुरेश नेहरे, विठ्ठल नामदेव वालगुडे, महेश ऊर्फ मछ्या नंदू पाटोळे अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले, कळंबा कारागृहातील सर्कल क्रमांक पाचमध्ये असलेले वाॅर्डर बंदी अमरजितसिंह कर्तारसिंग मान हा इतर बंदीजनांना व्यवस्थित वागा, असे समजावून सांगत असतो. इतरांच्या हालचालींवर लक्ष ठेवतो. त्यांची सर्व माहिती कारागृहातील पोलिसांना देतो. कारागृह प्रशासनास मदत करतो. या रागापोटी सर्कल क्रमांक पाचमध्ये असलेल्या आठ न्यायालयीन बंदीजनांनी मान याला हाताने, लाथाबुक्क्यांनी व लाकडी खुर्ची व लाकडी स्टुलाने मारहाण करून जखमी केले. यातील सातपुते, नेहरे, बालगुडे, पाटोळे हे मोका कारवाईतील आहेत. कारागृह शिपाई अरुण बोराडे हे वाद सोडविण्यासाठी गेले असता, त्यांनाही धक्काबुक्की केली. सर्कल प्रभारी तुरुंग अधिकारी सारिका मस्कर यांच्यासोबत वाद घातला. सर्कल क्रमांक १ मधील श्रेणी दोनचे अधिकारी एम. डी. होरे यांच्या हातातील काठी काढून घेत सरकारी कामात अडथळा आणला, अशी फिर्याद बोराडे यांनी दिली. त्यानुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.