कोल्हापूर : गांधीनगर (ता. करवीर) येथील शिरू चौक परिसरात बसवण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी निवेदन स्वीकारण्यास आले नसल्याच्या रागावरून रिपब्लिकन पार्टीच्या (आठवले) गटातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढून जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.डॉ. आंबेडकर यांचा गांधीनगर येथील शिरू चौकातील पुतळा कायमस्वरूपी ठेवण्यात यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आरपीआय’तर्फे सोमवारी निर्धार मोर्चा काढण्यात आला होता. दुपारी एकच्या सुमारास बिंदू चौक येथून मोर्चास प्रारंभ झाला. या मोर्चात रिक्षा, दुचाकीसह शेकडो भीमसैनिक सहभागी झाले. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे आणि जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा ‘जय भीम’च्या घोषणा देत अडीच वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या निरोपानुसार प्रा. शहाजी कांबळे आणि उत्तम कांबळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात आले. परंतु, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकांसोबत बैठक सुरू होती. त्यामुळे शिष्टमंडळाकडून निवेदन घेण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना अँटी चेंबरमध्ये बोलावले; पण कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन देण्याचा आग्रह धरत होते. मात्र, जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यास आले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेले कार्यकर्ते जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा देत पुन्हा बाहेर पडले. यानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रवेशद्वारावर चढून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्यामुळे वातावरण तणावग्रस्त झाले. धक्काबुक्की करत कार्यकर्ते गेटच्या बाहेर आले आणि तिथे ठिय्या मांडला. तसेच पुन्हा घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पोलीस उपअधीक्षकांनी निवेदन स्वीकारलेपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून करवीरचे पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव घटनास्थळी पोहोचले. अमरसिंह जाधव यांनी हे निवेदन स्वीकारून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले. निवेदनाची पोहोच कार्यकर्त्यांना दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी गांधीनगरकडे कूच केली. या मोर्चात बी. के. कांबळे, डॉ. अनिल माने, बाळासाहेब वाशीकर, अविनाश शिंदे, संजय लोखंडे, सुखदेव बुध्याळकर, कुलदीप जोगडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
‘आरपीआय’चा हल्लाबोल
By admin | Published: June 09, 2015 1:15 AM