तानाजी पोवार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा तसा सधन आहे. तसा शेतीसंपन्न जिल्हा असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण सर्वसामान्य आहे. येथे कायदा व सुव्यवस्था सुरळीत असल्याने पोलिसांवर हल्ल्याचे प्रमाणही अगदीच नगण्य आहे. जिल्ह्यात वर्षभरात पोलिसांवर हल्ल्याच्या जास्तीत जास्त आठ ते दहा घटना घडतात. गुन्हेगारांवर नेहमीच पोलिसांचा वचक राहिल्याने हल्ल्याच्या घटना तशा कमी आहेत.
पोलिसांची जरब असली तरी सरकारी नोकरदारांवर हल्ल्याच्या घटनेचे प्रमाण मात्र नजरेत भरणारे आहे. दरवर्षी सरासरी ७० घटना जिल्ह्यात सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ल्याच्या झाल्या आहेत.
पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना जिल्ह्यात अगदीच नगण्य आहेत. येथे कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण चांगले आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काही ठिकाणी अवैध व्यवसायाला विरोध करताना पोलिसांवर हल्ल्याच्या घटना घडतात.
तीन घटना...
अतिक्रमण काढताना पोलीस निरीक्षकावर हल्ला
एप्रिल २०२१ मध्ये महापालिकेमार्फत शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती. बिंदू चौक सबजेलजवळ रस्त्याकडेला मांडलेल्या वस्तू हटवताना विक्रेत्याने तत्कालीन वाहतूक पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की केली. त्याला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले.
गांजा विक्रेत्याचा पोलिसांवर हल्ला
मे २०२१ मध्ये संचारबंदीत शिरोळ तालुक्यातील उमळवाड येथे गांजा विक्रीचा अड्डा उद्ध्वस्त करताना तेथे कारवाईसाठी गेलेल्या चार पोलिसांवर गांजा विक्रेत्याने हत्यार उगारले. त्याने पोलिसांशी झटापट केली. त्यात एक पोलीसही जखमी झाल्याची शिरोळ पोलीस ठाण्यात नोंद आहे.
वाद मिटवताना पोलिसांस धक्काबुक्की
गेल्या महिन्यात मध्यरात्री व्हिनस कॉर्नर येथे दोन गटातील वाद मिटवण्यासाठी पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. जमावातील एकाने आपण पोलीस असल्याची बतावणी करून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन हल्ला केला. त्याला शाहुपुरी पोलिसांनी दुसऱ्या दिवशी अटक केली.
सरकारी कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले
वर्षे : पोलीस इतर सरकारी कर्मचारी
२०१८ : ०९ ४६
२०१९: ०७ ५९
२०२० : १२ ७९
२०२१ (नोव्हेंबरपर्यंत): ०८ - ८०
वर्षभरात सात जण गजाआड
गेल्या अकरा महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ल्याच्या ८० घटना घडल्या. त्यापैकी पोलिसांवर हल्ल्याच्या फक्त ९ घटना घडल्या. त्यापैकी ७ जणांना अटक केली. त्यांच्यावर खटले दाखल केले आहेत.
पोलीस हा कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. नागरी रक्षण हे त्याचे प्रथम कर्तव्य असते. अवैध गोष्टीला पोलिसांचा नेहमीच विरोध असतो. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांची कधीही गय केली जाणार नाही, त्याला योग्य ते शासन होईलच.- शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा.