डॉ. अनिरूद्ध आठल्ये - रत्नागिरीप्रत्येक वर्षी २४ सप्टेंबर हा हृदयविकार जागरुकता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हृदयविकाराबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून जागरूकता निर्माण केली जाते. जीवन जगणारा असा एकही माणूस नसेल ज्याला हृदयाबाबत माहिती नसेल. माणसाचे हृदय हे अंजिरासारख्या आकाराचे असून, ते दोन फुफ्फुसांमध्ये असते. हृदयाचा दोन तृतीयांश भाग छातीच्या मध्यवर्ती रेषेच्या डाव्या बाजूला व उरलेला एक तृतीयांश भाग उजव्या बाजूला असतो. हृदयाचे वजन साधारणपणे अर्धा किलोग्रॅम (एक पौंड) असते, त्याचा आकार हाताच्या मिटलेल्या मुठीपेक्षा थोडा मोठा असतो. माणसाचे आकारमान व वजन यांच्या प्रमाणातच त्याच्या हृदयाचे आकारमान व वजन असते. हृदय म्हणजे स्नायूची एक पिशवी असेच थोडक्यात वर्णन करता येईल. हृदयाचे मुख्य कार्य म्हणजे जीवनधारा असा ‘प्राणवायू’ याचा रक्ताद्वारे शरीरातील सर्व पेशींना अखंड व नियमित पुरवठा करणे होय. मानवी हृदयाची कार्यक्षमता खरंतर फारच आश्चर्यकारक आहे. एखाद्या शक्तिमान मोटर इंजिनप्रमाणे त्याची राखीव शक्ती प्रचंड असून, दोन अडचणीच्या वेळी ती वापरता येते.हृदयाची धडधड (धडकन) हृदयाच्या उजव्या कर्णिकेच्या स्नायूमय भागात एक सूक्ष्म मज्जापेशी असून, त्याला ‘सायनो-आॅरिक्युलर नोड’ असे म्हणतात. कर्णिकेच्या या भागातून दर मिनिटाला सुमारे ७० ते ७५ विद्युत-उन्मेष बाहेर पडतात. या विशिष्ट प्रेरणेनुसार हृदयाचे टीकटीक ठोके पडतात. हृदयात छोट्या - मोठ्या झालेल्या विकारांमुळे हृदयाला धोका संभवतो.‘हृदयरोग’ या नावाखाली केवळ हृदयाचेच विकार अभिप्रेत नसून, रक्तवाहिन्यांच्या लहान - मोठ्या विकृतीही त्यात समाविष्ट होतात. हृदय व रक्तवाहिन्या हे रक्ताभिसरण संस्थेचे दोन प्रमुख घटक असल्याने असा समावेश वास्तविकच वाटतो. प्रत्यक्ष हृदयविकारापेक्षा रक्तवाहिन्यांचे विकारच अधिक प्रमाणात मृत्यूस कारणीभूत ठरतात. हृदयरोगाचे नाव पूर्वीपेक्षा आज अधिक प्रमाणात दिसून येते व आधुनिक रोगनिदान निश्चितीही सुधारलेली आहे. खरंतर कोणत्याही रोगाचे निदान होण्यास रुग्णांच्या पूर्वीच्या व सध्याच्या रोगाच्या संपूर्ण इतिहासाला फार महत्व आहे. योग्य निदान करण्यासाठी ईसीजी, क्ष-किरण तपासणी यांसारख्या तपासणीची विशेष मदत घेतली जाते.हृदयाचे व रक्तवाहिन्यांचे विकार असणाऱ्यांचे सरासरी वयोमान ३० ते ५० वर्षे असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शरीराची आणि विशेषकरुन हृदयाची काळजी घेणे फार गरजेचे आहे. हृदयविकाराबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी एवढीच अपेक्षा!(लेखक रत्नागिरी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत.)आधुनिक जगणंच होतंय मरणाचं कारण!डॉ. अमेय आमोणकर --रत्नागिरी पूर्वी साधारणत: वयाच्या ५० ते ६०व्या वर्षामध्ये हृदयरोग असणाऱ्यांबरोबर हृदय विकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, सध्याच्या धावपळीच्या युगात ह्रदयविकाराचे रूग्ण २० ते ३० वयोगटातील युवावर्गातील दिसतात. फास्टफूड, हाय कॅलरीजचे खाद्यपदार्थ, धुम्रपान तसेच व्यायामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाढलेले वजन यासारख्या गोष्टी ह्रदयविकारासाठी कारणीभूत ठरते. रक्तवाहिनीतील कोलेस्ट्रॉल प्ला डिपॉझीट होऊन फुटतात. त्यामुळे रक्ताची गुठळी होते. ह्रदयास रक्तपुरवठा होत नाही आणि हार्टअॅटक संभवतो. आयुष्यात कधी दुखल नसेल इतकं दुखत. दहा मिनिटापेक्षा अधिक दुखल्यास रूग्णाला तात्काळ दवाखान्यात हलविणे गरजेचे आहे. मधुमेह, ज्येष्ठ व्यक्ती, महिलांमध्ये चालल्यामुळे धाप किंवा दम लागणे, अचानक घाम येणे, चक्कर येणे, छातीत धडधडणे ही लक्षणे आढळतात.हृदयाची गती दिवसा जास्त असते, काही वेळाने ती कमी होते. त्यामुळे हृदयाची गती नेमकी किती हे जाणता येत नाही. असा रुग्ण जर त्याच्या आयुष्यात बिझी असेल तर त्याला उगाचच रुग्णालयात भरती करून ठेवणे गरजेचे नसते. त्यावेळी त्याला होल्टर मॉनिटरिंग सिस्टीम लावून त्याच्या हृदयाचे ठोके मोजता येतात. हे मशीन २४ तास त्याच्या हृदयाचे ठोके मोजते आणि त्याची सरासरी काढून त्याच्या आजाराबाबतची माहिती देते. प्रत्येकाने आरोग्याबाबत जागृत राहणे गरजेचे आहे. संतुलित आहार, व्यायामाबरोबरच वेळेवर औषधोपचार, आवश्यकता भासल्यास वैद्यकीय तपासण्या करणे गरजेचे.(लेखक प्रख्यात कोकण कार्डियाक सेंटरचे प्रमुख आहेत.)शब्दांकन : मेहरून नाकाडेगरज आहे व्यायामाची...!ह्रदयविकार टाळता येऊ शकतो. मात्र त्यासाठी दररोज ३० ते ४५ मिनिटे अॅरोबिक व्यायामाची गरज आहे. डायट किंवा आहारावरील नियंत्रण तसेच वजन कमी करण्याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. धुम्रपान पूर्णत: वर्ज्य करण्याची आवश्यकता आहे. इतकेच नव्हे तर १८ वर्ष पूर्ण झालेनंतर युवकांनी वर्षातून एकदा तरी रक्त तपासणी करावी. शिवाय रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल सारख्या अधिकच्या तपासण्या करून घेणे इष्ट ठरेल. आवश्यकता भासल्यास ह्रदयाची स्पंदने, धमन्या, रक्त वाहिन्या व ह्रदयामधील इतर आजाराची तपासणी इकोव्दारे होते.हृदयविकार ताणतणावाशी निगडीत आहे. त्यामुळे तो दूर ठेवण्यासाठी शारीरिक व्यायाम गरजेचा आहे. स्नायुंच्या योग्य हालचालीतून मेंदुला रक्तपुरवठा तसेच आॅक्सीजन पुरवठा चांगला होतो. मनावर नियंत्रण मिळविण्यासाठी योगासन, प्राणायाम ही तितकेच महत्वाचे आहे. त्याचबरोबर विचारांची सकारात्मकता आणि संयम यामुळे मेंदुतील सर्व ग्रंथीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पिच्युटरी ग्रंथीचे कार्य सुरळीत सुरू रहाते. - डॉ. क़ृष्णा पेवेकर, मानसोपचार तज्ज्ञ
एक प्रयत्न... जागरूकतेसाठी...!
By admin | Published: September 23, 2015 10:01 PM