लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : उचगाव(ता. करवीर) येथील मुख्य चौकातील एका बँकेचे साडेअकरा लाख रुपयांची रोकड असलेले एटीएम मशीन फोडण्याचा सोमवारी (दि.९) मध्यरात्रीचा प्रयत्न उघडकीस आला. या प्रकरणी करवीर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने चोवीस तासांत तिघा संशयितांना अटक केली. या तिघांमध्ये एका सराईत गुन्हेगाराचा समावेश आहे. सचिन दत्तात्रय गवळी (वय ३३, रा. स्वाधारनगर, साळोखे पार्क), राहुल राजेश माने (३०, कनाननगर), चंद्रकांत शशिकांत तळकर ( ४०, रा. छत्रपती शिवाजी पुतळा, मूळ रा. करजगा, हुक्केरी, बेळगाव) यांना अटक केली. तिघेही गुन्हेगार असून कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होते. जर्जर आजारामुळे त्यांना जामीन मिळाला होता. जामीन मिळताच पुन्हा कारनामे सुरू केल्याचे तपासात पुढे आले.
एटीएम मशीन फोडून पैसै चोरण्याचा प्रयत्न झाला. मशीनमध्ये असणारी ११ लाख ५० हजारांची रोकड काही चोरट्यांना आतील दरवाजा न तुटल्यामुळे नेता आली नाही. याची फिर्याद संबधित बँकेने गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. तपास गांधीनगर पोलीस ठाणे व समांतर करवीर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने केला. सीसीटीव्ही फुटेज व वापर झालेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून संबंधितांपर्यंत पोलीस पोहोचले. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्या तिघांनी त्याच रात्री उचगाव येथील एटीएम फोडण्याच्या प्रयत्न केला. तत्पूर्वी, अगोदर राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकमधील दोन बॅटऱ्या व राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अरुणोदय सोसायटीमधील एका फुड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे कार्यालय फोडून तेथील एक फ्रीज, मोपेड चोरून नेल्याचे कबूल केले. हा सर्व मुद्देमाल सव्वा लाख रुपयांपर्यंतचा होता. एटीएम फोडण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्यही जप्त केले. ही कारवाई करवीरचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, उपनिरीक्षक अतुल कदम, सुनील माळगे, सुजय दावणे, सुनील कुंभार, राम माळी, सूरज देसाई, विजयकुमार शिंदे, सचिन बेंडकळे यांनी केली.
तब्बल १५ गुन्हे
संशयित सचिन गवळी याच्याविरोधात एक खून, दोन दरोडा, जबरी चोरी -२, घरफोडी-४, दुखापत -१, विनयभंग -१, आत्महत्येचा प्रयत्न -१, असे एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. राहुल माने व चंद्रकांत तळकर यांच्याविरोधात प्रत्येकी एक गुन्हा शाहूपुरी व करवीर पोलीस ठाण्यात दाखल आहे.
फोटो : १३०८२०२१-कोल-करवीर पोलीस
ओळी : करवीर पोलीस उपअधीक्षक पथकाने पकडलेले संशयित आरोपी डावीकडून चंद्रकांत तळकर, राहुल माने, सचिन गवळी.