कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा नव्याने सापडलेला मोबाईल नष्ट करण्याच्या उद्देशाने तो दगडाने फोडून तटबंदीवरुन बाहेर फेकल्याचा व पुरावा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कारागृहातील शिपाई सचिन नवनाथ रणदिवे (वय ३५, रा. कळंबा कारागृह, कोल्हापूर) याच्यावर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत कारागृहात पाच घटनांमध्ये १६ मोबाईल व साहित्य मिळाले. मात्र, मोबाईल प्रकरणात कर्मचारी सापडल्याची ही पहिलीची घटना आहे, त्यावरुन सुरक्षा यंत्रणाही यात सहभागी असल्याचे स्ष्ट झाले.
कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कैद्यांना मोबाईल व गांजा पुरविण्याचे प्रकरण राज्यभर गाजत आहेत. कारागृहातील दवाखान्यात मोबाईल लपवल्याची गोपनीय माहिती कारागृह अधीक्षक चंद्रसेन इंदुरकर यांना मिळाली, त्यानुसार शुक्रवारी सकाळी विशेष पथकाद्वारे कारागृहातील दवाखान्यात शोध मोहीम राबविण्यात आली. यावेळी काहीही न सापडल्याने पथक निघून गेले. त्यानंतर पथकाने दुपारी पुन्हा येत संशयावरुन वाॅर्डर वाॅचमनकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने सापडलेला मोबाईल शिपाई सचिन रणदिवे उर्फ बाबा यांच्याकडे दिल्याचे सांगितले. पथकाने रणदिवे याच्याकडे विचारपूस केली, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर ‘खाकी’ दाखवल्यानंतर संबधित मोबाईल फोडून तटबंदीवरुन बाहेर फेकल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांनी तटबंदीबाहेर तपासणी केली असता, मैल्याने माखलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत फोडलेला मोबाईल सापडला. तो जप्त करुन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. वरिष्ठ तरुंग अधिकारी साहेबराव आढे यांच्या फिर्यादीनुसार शिपाई सचिन रणदिवे याच्यावर जुना राजवाडा पोलिसात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
पाईपमध्ये लपविला मोबाईल
विशेष तपासणी पथक रिकाम्या हाताने माघारी फिरल्यानंतर शिपाई रणदिवे याने वॉर्डर वॉचमनच्या मदतीने दवाखान्यातील पाईपमध्ये लपवून ठेवलेला मोबाईल शोधून काढला. मोबाईल जमा करा, असे वॉर्डर वॉचमनने सांगताच त्याने कशाला पोलिसांची झंझट, असे सांगून तो दगडाने ठेचून फोडला व तटाबाहेर फेकल्याचे वॉर्डर वॉचमननी सांगितले. तो फेकताना त्याची छबी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचे कारागृह अधीक्षक इंदुरकर यांनी सांगितले.
कर्मचारी प्रथमच गजाआड
कळंबा कारागृहात गेल्या १५ दिवसांतील पाच घटनांमध्ये तब्बल १५ मोबाईलसह इतर साहित्य सापडले. परंतु, या प्रकरणात कर्मचाऱ्यांचा सहभाग अद्याप स्पष्टपणे दिसला नव्हता. मात्र, शुक्रवारी प्रथमच कारागृहातील शिपाई कर्मचाऱ्याचा संबध असल्याचे दिसून आले.
कोट..
या घटनेचा अहवाल वरिष्ठ प्रशासनाकडे पाठवला असून, कर्तव्यात कसूर केल्याबद्दल वरिष्ठ प्रशासन संबधित संशयित शिपायावर कारवाई करेल. - चंद्रमणी इंदुरकर, अधीक्षक, कळंबा कारागृह, कोल्हापूर
कोट..
कारागृहातील संशयित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले असून, चौकशी करुन त्याच्यावर कारवाई करणार आहे. - प्रमोद जाधव, पोलीस निरीक्षक, जुना राजवाडा पोलीस ठाणे, कोल्हापूर.