कोल्हापूर : कारागृहाच्या किमान क्षमतेएवढेच बंदीजन ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी शुक्रवारी दिली. ते शुक्रवारी कळंबा कारागृहातील कर्मचाऱ्यांशी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधण्यासाठी दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.रामानंद म्हणाले, राज्यातील कारागृहांची क्षमता २४ हजारांची असताना तेथे ३९ हजार बंदीजन होते. कारागृहांमध्ये कोरोना संसर्गाची लागण होऊ नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार नऊ हजार बंदीजनांना पॅरोल व काही न्यायाधीन बंंदींना जामीन मंजूर झाला. त्यामुळे ही संख्या २७ हजारांपर्यंत खाली आली आहे.
राज्यात ६० कारागृहे आहेत. यांतील ४५ ठिकाणी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले. ऑर्थर रोड कारागृहामध्ये १५८ बंदीजनांना कोरोनाची लागण झाली होती. ते पूर्ण बरे झाले आहेत. त्यांतील चार कैदी होते. त्यांतील दोघे कोरोना पॉझिटिव्ह होते. अन्य दोघांचा हृदयरोग व न्यूमोनियाने मृत्यू झाला. कारागृह प्रशासनाकडे कर्तव्यावर असलेल्या साठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांपैकी ४८ जण पूर्ण बरे झाले आहेत. यावेळी कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके, करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर उपस्थित होते.तात्पुरत्या कारागृहाची सोयसंशयित गुन्हेगारांना कारागृहाच्या दारापर्यंत आणल्यानंतर त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल आले आहेत. त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही यासाठी राज्यात ३३ आपत्कालीन (तात्पुरती) कारागृहे स्थापन केली आहेत. या ठिकाणी न्यायाधीन कैद्यांना क्वारंटाईन केले जाते. ते पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचा अहवाल आल्यानंतरच त्यांना कारागृहात पाठविले जात आहे.