कुरुंदवाड -
फेसबूकवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणावरून गुन्हा दाखल केल्याच्या रागातून नुर काले समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोरच शिवसेना तालुका उपप्रमुखावर डिझेल फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेचे गांभीर्य अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होऊन शिवसैनिकांना शांततेचे आवाहन केले. नुर कालेसह दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिक शांत झाले.
दरम्यान, दोन गट आक्रमक झाल्याने इंचलकरंजी, शिरोळ, जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील मोठा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला, त्यावेळी शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तवाड ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष नूर काले याच्या फेसबुक अकाउंटवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत होती, तर शिरोळ तालुका शिवसेनेने शुक्रवारी कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून काले याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. याचा राग मनात धरुन काले समर्थकांनी शनिवारी दुपारी दत्तवाड येथील शिवसेना तालुका उपप्रमुख युवराज घोरपडे यांच्या हाँटेलवर दगडफेक करून दहशत निर्माण केली.
याची तक्रार दाखल करण्यासाठी घोरपडे यांच्यासह शिवसैनिक पोलीस ठाण्याजवळ येताच काले समर्थक महिलांनी घोरपडे यांच्यावर डिझेल फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
अचानक घडलेल्या घटनेमुळे गोंधळ उडाला.
या प्रकाराने तालुक्यातील शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून काले याच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक गायकवाड यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.
दरम्यान, सोमवारपर्यंत कालेसह दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील, तालुका प्रमुख वैभव उगळे, शिवसेना जिल्हा संघटिका मंगल चव्हाण, वैशाली जुगळे, शहर प्रमुख बाबासो सावगावे, आप्पासो भोसले, राजू बेले, संतोष नरके यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
फोटो ओळ - कुरुंदवाड पोलीस ठाण्यासमोर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.