कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या पश्चिम दरवाजाशेजारी ओटी विकण्याच्या वादातून शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास दोघा विक्रेत्यांत हाणामारी झाली. यावेळी मंगेश कांबळे हा गणेश गुरव याच्या अंगावर रॉकेल ओतून त्याला पेटविण्याचा प्रयत्न करीत असताना गुरव याच्या बहिणींनी प्रसंगावधान राखून मंगेशला पकडून बेदम चोप देत भावाला वाचविले. मंदिर परिसरात सुरू असलेली हाणामारी पाहून भाविक गोंधळून गेले. येथे बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांनी हस्तक्षेप करून दोघांना जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. याठिकाणी काही व्यापाऱ्यांनी मध्यस्थी करून दोघांची समजूत घातली. त्यानंतर पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्यासमोर दोघांनाही उभे केले असता त्यांनी आमचा वाद परस्पर मिटविला असून, आमची तक्रार नसल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी संशयित मंगेश रघुनाथ कांबळे (२०, रा. अंबाबाई मंदिर परिसर) व गणेश ज्ञानबा गुरव (वय २८, रा. राजाराम चौक, टिंबर मार्केट) या दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून दिले. अंबाबाई मंदिराच्या पश्चिम दरवाजाशेजारी गणेश गुरव व मंगेश कांबळे हे दोघेजण ओटी विक्रीचा व्यवसाय करतात. सकाळी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ते आपल्याकडचीचओटी विकत घेण्यासाठी आग्रह धरीत असताना त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्याचे पर्र्यवसान हाणामारीत झाले. अचानक झालेल्या हाणामारीमुळे गुरवच्या बहिणी त्याठिकाणी आल्या. यावेळी मंगेश कांबळे याने रॉकेलने भरलेली बाटली आणून गणेश गुरव यांच्या अंगावर ओतून त्याला पेटविण्याचा प्रयत्न करीत असताना गुरवच्या बहिणींनी प्रसंगावधान ओळखून मंगेशला पकडून बेदम चोप दिला. ही हाणामारी पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने गोंधळ उडाला. यावेळी मंदिर परिसरात बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांनी हस्तक्षेप करून दोघांना जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. याठिकाणी हे प्रकरण समझोत्याने मिटविण्यात आले. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात विक्रेत्याला पेटविण्याचा प्रयत्न
By admin | Published: March 29, 2015 12:46 AM