इचलकरंजी : जुने पारगाव येथील पुरग्रस्तांना प्लॉट मिळावे, या मागणीसाठी गावातील रहिवाशांनी प्रांत कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.त्यानंतर प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांनी बैठकीचे आवाहन करत पुरग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी येत्या पंधरा दिवसांत यावर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पुरग्रस्त शांत झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.नदीला येणाऱ्या महापुरामुळे जुने पारगाव येथील रहिवाशांची घरे पूर्णपणे बुडालेली होती. या पुरग्रस्तांना प्लॉट मिळावे, यासाठी २००५ पासून प्रशासनाकडे वारंवार मागणी केली. आंदोलनेही केली, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे संतप्त झालेल्या पुरग्रस्तांनी अखेर प्रांत कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना रोखले. यामध्ये पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले.त्यानंतर प्रांताधिकारी खरात यांच्यासोबत पुरग्रस्तांची बैठक पार पडली. यावेळी पुरग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेतली. या बैठकमध्ये प्रांताधिकाऱ्यांनी येत्या पंधरा दिवसांत यावर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पुरग्रस्त शांत झाले. मात्र येत्या पंधरा दिवसांत यावर योग्य तो तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी पोलिस प्रशासनानेही कडक बंदोबस्त ठेवला होता.
जुने पारगाव येथील पुरग्रस्तांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न, प्रांत कार्यालयासमोरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 5:01 PM