इचलकरंजी : पूर्वसूचना देऊन अतिक्रमण असलेला मांसाहारी खाद्यपदार्थांचा गाडा काढण्यासाठी आलेल्या अतिक्रमण निर्मूलन पथकासमोरच गाडा चालकाने अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सलमान मुल्ला असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
शहरातील सर्व प्रमुख चौक व रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. त्याचा वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात नागरिकांतून प्राप्त तक्रारींमुळे नगरपरिषदेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेतली आहे. शाहू पुतळा परिसरात सलमान मुल्ला याचा मांसाहारी खाद्यपदार्थांचा गाडा आहे. पथकाने त्याला अतिक्रमण काढण्याबाबत पूर्वसूचना दिली होती. त्यानंतर कारवाई केली.
दरम्यान, बुधवारी डेक्कन चौक परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू असताना सलमान मुल्ला हा त्याठिकाणी आला आणि त्याने अंगावर डिझेल ओतून घेत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याठिकाणी बंदोबस्तासाठी असलेले शहर वाहतूक शाखेचे मारुती गवळी धावून आले व त्यांनी मुल्ला याला रोखले आणि ताब्यात घेतले.
या घटनेनंतर नागरी सुविधा, बेकायदेशीर कामे, घरकुल बांधकामाच्या मागणीसाठी आणि प्रशासनाच्या कारवाईविरोधात आत्महत्येचा इशारा देणे आणि आत्मदहनाचा प्रयत्न करणे असे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळीच अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करून कामकाजामध्येही सुधारणा करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.