लोकमत न्यूज नेटवर्क
दानोळी : येथील आनंदा-सांगले पूर्व मळ्यातील रस्त्याचा वाद सोडविण्यासाठी प्रशासन आले होते. यावेळी नितीन आप्पासो सांगले यांनी रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला तर वैशाली सांगले यानी विषप्राशन केले. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. दरम्यान, या रस्त्याचा निर्णय २७ जुलैपर्यंत प्रलंबित ठेवण्यात आला आहे. वैशाली सांगले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
काही दिवसांपासून आनंदा-सांगले मळ्यातील रस्त्याचा वाद सुरु आहे. सोमवारी हा रस्ता खुला करण्यासाठी मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल व पोलीस प्रशासन आले होते. मात्र, कारवाई सुरु करण्यापूर्वी सरकारी आदेश दाखवून कोणताही अडथळा न आणण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. यावेळी सांगले कुटुंबीयांनी प्रशासनाने दिलेल्या निर्णयामध्ये रस्त्याचा उल्लेख दाखवावा, असा पवित्रा घेतला. पण प्रशासनाने आक्रमक भूमिका घेताच नितीन सांगले यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून पेट्रोलचे कॅन हिसकावून घेतले तर वैशाली सांगले यांनी विषारी औषध प्राशन केले. यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. वैशाली सांगले यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य पाहून २७ जुलैला या रस्त्याचा निर्णय देण्याचे जाहीर केले आहे.
यावेळी मंडल अधिकारी संजय सुतार, तलाठी शैलेश कोईंगडे, कोतवाल अकबर मुल्लानी, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस नाईक खंडाळे, कॉन्स्टेबल नाईक, कॉन्स्टेबल कोळी, रोहित डावाळे, अमोल अवघडे, विजय पाटील, मिलन शिंगाडे, गोविंद गाडीवडर, धिरज पवार उपस्थित होते.