इचलकरंजी : पेन्शन व वैद्यकीय देयके वारंवार मागणी करूनही मिळत नसल्याने नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी नारायण शंकर लंगोटे यांनी गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता पालिकेच्या इमारतीतच पेट्रोलजन्य पदार्थ ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
नगरसेवक विठ्ठल चोपडे व काही नागरिकांच्या प्रसंगावधनामुळे तत्काळ लंगोटे यांच्या हातातील काडीपेटी काढून वाचविले. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे पालिकेत मोठी खळबळ उडाली.मिळालेल्या माहितीनुसार नगरपालिकेतील बांधकाम विभागातील कर्मचारी नारायण लंगोटे हे गेल्या चार महिन्यांपूर्वी निवृत्त झाले. ते सध्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पैशांची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी पालिकेकडे पेन्शन व वैद्यकीय देयके यांची मागणी केली. अनेकवेळा मागणी करूनही त्याची पालिकेने कोणतीही दखल घेतली नाही.गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांची पेन्शन थकीत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पेन्शन मिळत नसल्याने संतप्त झालेल्या लंगोटे यांनी सकाळी साडेअकरा वाजता पालिकेत धाव घेतली.
विरोधी पक्ष कार्यालयाजवळ आल्यानंतर त्यांनी पेट्रोलजन्य पदार्थ अंगावर ओतून घेतले व हातात काडीपेटी घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नगरसेवक चोपडे, युवराज शिंगाडे, रणजित शिंगाडे यांनी तत्काळ त्यांच्या हातातील काडीपेटी काढून घेतली. त्यानंतर नळाखाली नेऊन त्यांच्या अंगावर पाणी ओतले आणि दालनांमध्ये बसवले.या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लंगोटे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, आॅक्टोबर २०२० मध्ये पालिकेच्या आवारात समाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी विविध कारणांमुळे अंगावर पेट्रोलजन्य पदार्थ ओतून घेवून आत्मदहन केले.
या घटनेची देखील चर्चा सुरू होती. लंगोटे यांचे वैद्यकीय देयक चाळीस हजारांहून अधिक असल्याने स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी ठेवले आहे.