कोल्हापूर : वडूज (सातारा) येथील पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेला संशयित अतुल बापूराव पवार (वय ३१, रा. वडूज,ता. खटाव, जि.सातारा) या कळंबा कारागृहातील न्यायाधीन बंदिजनाने गुरुवारी रात्री औषधौपचाराकरिता दिलेल्या बी.पी. व मधुमेहाच्या प्रत्येकी आठ गोळ्या व स्वच्छतेसाठी दिलेले डेटाॅल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब इतर बंदिजनांनी कारागृह कर्मचाऱ्यांना सांगितल्यानंतर त्याला प्रथम कारागृहातील दवाखान्यात व त्यानंतर लाईन बझारातील सेवा रुग्णालयात दाखल केले. त्याच्याविरोधात कारागृहाच्यावतीने शुक्रवारी कर्मचारी यशवंत बनकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल झाला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बंदिजन पवार याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात विविध गुन्हे नोंद आहेत. विविध प्रकरणात न्यायालयीन बंदी म्हणून तो सातारा कारागृहात बंदिस्त होता. तेथे अतिरिक्त ठरवून त्याची रवानगी १५ डिसेंबर २०२० कोल्हापुरातील कळंबा कारागृहात केली. तेव्हापासून आजतागायत तो कळंबा कारागृहातील सर्कल क्रमांक ६ मधील स्वतंत्र बराकी दोनमध्ये होता. त्याने गुरुवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर शुक्रवारी कारागृहाच्यावतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली. कळंबा कारागृहाचे अधीक्षक चंद्रमणी इंदलकर यांनी वडूज पोलीस ठाण्यात त्याच्या गुन्ह्याबद्दल माहिती मागविली. त्यात त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यात नव्याने एक गुन्हा नोंद होत असल्यामुळे त्याने निराश होऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले.