कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रसिद्ध राजाभाऊ भेळचे मालक रविंद्र उर्फ बापू शिंदे (रा. मंगळवार पेठ) यांच्यावर तिघांनी सशस्त्र प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला. यातील दोघांना संतप्त नागरिकांनी घटनास्थळी पकडून बेदम चोप दिला. हल्लेखोरांचा साथीदार पळून गेला. नेहमी गजबजलेल्या शाहू खासबाग मैदान परिसरात दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, राजाभाऊ भेळचे मालक रवींद्र शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शाहू मैदान चौकातील एका गाळ्यात भेळचा स्टॉल सुरू केला. चार दिवसापूर्वी रात्री उशीरा अज्ञात दोघांनी खाऊ गल्लीतील भेळच्या गाडीवर दगड मारला होता. दरम्यान, मंगळवारी रात्री तिघे त्यांच्या स्टॉलवर भेळ खाण्यासाठी पुन्हा आले.
शेजारील कट्ट्यावर बसून भेळ खाताना त्यांनी आपल्याकडील शस्त्रे दाखवली. त्यातीलच एक संशयित आज, दुपारी स्टॉलवर आला. त्याने भेळ मागितली. त्याचे दोन साथीदार तेथे आले. कर्मचाऱ्यांनी त्यांना भेळ दिली. एक जण पान खाऊन स्टॉल जवळच थुंकला. त्याबाबत कर्मचाऱ्यांनी त्यांना जाब विचारला. दरम्यान एकाने शस्त्र काढून शिंदेंवर हल्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनी प्रसंगावधान राखून त्याला ढकलून दिले. हा प्रकार पाहून नागरिक मदतीसाठी धावले. दरम्यान हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्याने तेथून पळ काढला. मात्र दोघांना पकडून नागरिकांनी बेदम चोप दिला. जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर, पसार झालेल्या संशयिताचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच शिंदे यांचे नातेवाईक व मित्रपरिवार आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती.