कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंग शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सीपीआरमधील परिचारिकाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी हा प्रकार घडला असला तरी, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असून, अजूनपर्यंत लेखी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
मूळची सोलापूर जिल्ह्यातील ही विद्यार्थिनी असून, रविवारी सकाळी ऑपरेशन थिएटरमध्ये हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येते. या प्रकारानंतर संबंधित परिचारकास अन्य विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केली. या मुलीने आई-वडिलांना ही घटना सांगितल्यानंतर ते दोेघेही सोमवारी कोल्हापुरात आले. यानंतर या परिचारकाने त्यांना दंडवत घालत, माझी चूक झाली, मला माफ करा म्हणून विनवणी केली. मुलीने तक्रार केली, तर तुमचीही बदनामी होईल, असे या मुलीच्या आई-वडिलांना समजून सांगण्यात आले. समजून सांगण्यासाठी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.
दरम्यान, या सर्व प्रकारात या मुलीची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येेते. परंतु पोलीस ठाण्यात किंवा महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांच्याकडे कोणतीही लेखी तक्रार करण्यात आलेली नाही. संबंधित परिचारकाकडून वैयक्तिक पातळीवर लेखी लिहून घेऊन हे प्रकरण संपवल्याची चर्चा आहे.
कोट
माझ्याकडे आतापर्यंत कोणतीही लेखी तक्रार आलेली नाही. जर याबाबतीत तक्रार आली, तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.
डॉ. एस. एस. मोरे
अधिष्ठाता, राजर्षी शाहू महाराज शासकीय वैदयकीय महाविद्यालय, कोल्हापूर