कोल्हापुरातील अनेक गावातील विजेचे कनेक्शन तोडले जात असून यामुळे शेतकरी आता चांगलेच संतप्त झालेले दिसून येत आहेत. अनेक गावात वीज कनेक्शन तोडल्याने शेतीला पाणी न मिळाल्याने शेतीचे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या एका शेतकऱ्याने चक्क आत्मदहनाचा प्रयत्न महावितरण कार्यालयातच केला.
कोल्हापुरात शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन तोडल्याने महावितरणच्या कार्यालयातच कार्यकारी अभियंता यांच्यासमोर डिझेल अंगावर ओतून शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. गावातील वीज कोणतीही पूर्वसूचना न देता तोडण्यात येत असल्याने सोमवारी आक्रमक गावकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास आले होते. महे ,कसबा बीड, वाशी या गावांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ तब्बल तासभर अधिकाऱ्यांची वाट बघत होते. सोबतच ते डिझेलचा कॅन ही शेजारी घेऊन बसले होते मात्र तरीही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले अन् एकच राडा झाला.
शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन तोडल्याच्या निषेधार्थ महावितरणचे कार्यकारी अभियंता डी. एस. पाटील यांच्यासमोर डिझेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा यावेळी प्रयत्न केला. यावेळी कार्यालयात एकच गोंधळ उडाला. अंगावर डिझेल ओतल्यामुळे शेतकऱ्याच्या खिशात असणारी काडेपेटी भिजल्याने आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी त्याला रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मात्र महावितरणचे अधिकारी आणि शेतकरी, गावकरी यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. वीज कनेक्शन अनेक गावातील तोडले जात असून यामुळे होणारे शेतीचे नुकसान अधिक आहे. त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आता आक्रमक झालेले दिसून येत आहेत.