कोल्हापूर : पांजरपोळ औद्योगिक वसाहतीतील अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार करूनही कारवाई करत नाहीत म्हणून समीर बालेखान पठाण याने महानगरपालिकेच्या नगररचना विभागात अंगावर रॉकले ओतून पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पठाण याला रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारी रात्री ८.१५ वाजता उपशहर रचनाकारांसमोर घडली.
समीर बालेखान पठाण हा आरटीआय कार्यकर्ता असून, त्याने पांजरपोळ येथील औद्योगिक वसाहतीत लियाकत मोमीन व शहाजी पाटील यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामप्रकरणी चार- पाच महिन्यांपूर्वी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेतली जात नाही, असा त्याचा आक्षेप होता. म्हणून त्याने शुक्रवारी रात्री ८.१५ वाजता उपशहर रचनाकार रमेश मस्कर यांच्या कार्यालयात त्यांच्यासमोर अचानक कॅनमधील रॉकेल अंगावर ओतून घेतले. त्यानंतर खिशातील काडेपेटी काढून तो पेटवून घेणार तोच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यास रोखले. त्यानंतर मस्कर यांनी पोलिसांना पाचारण करून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला.
याबाबत कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘समीर नदाफ यांनी डिसेंबर २०२० मध्ये दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून कारवाई सुरू झाली होती. ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे, त्या लियाकत मोमीन व शहाजी पाटील यांना नोटीस दिली होती. कोविड काळात बांधकाम तोडण्यास न्यायालयाची मनाई होती. त्यामुळे बांधकाम पाडता आले नाही. म्हणून या दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.’
मात्र, पठाण याने अनधिकृत बांधकाम करण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई करावी, अशी मागणी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यासंबंधी कारवाईचा प्रस्ताव प्रशासक बलकवडे यांच्याकडे पाठविला आहे. कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असताना पठाण याने आत्मदहनाचा प्रयत्न केला म्हणून त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
समीरने अधिकाऱ्यांना धमकावले
समीर याने अंगावर रॉकेल ओतून घेत असताना मी तुम्हला सोडणार नाही, तुम्हा सगळ्यांना कामाला लावतो, अशा शब्दांत अधिकाऱ्यांना धमकावले असल्याचे फिर्यादी गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
- फोटो देत आहे-