कोल्हापूर : न्यायालयीन कामकाजासाठी कळंबा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आलेल्या कैद्याने परत जाताना चपलांमध्ये दोन मोबाइल लपवून आत जाण्याचा प्रयत्न केला. कारागृहाच्या गेटवर अंगझडतीत हा प्रकार उघडकीस आला. याबाबत तुरुंग अधिकाऱ्यांनी कैदी प्रदीप विश्वनाथ जगताप याच्यासह त्याला मदत करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तुुरुंग रक्षक महेश दिलीप देवकाते (वय ३७, रा. कळंबा, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली.कळंबा मध्यवर्ती कारागृहात रविवारी सुरक्षा रक्षकांना ड्रेनेजमध्ये एक मोबाइल सापडला होता. त्या घटनेची चौकशी सुरू असतानाच सोमवारी प्रदीप जगताप हा कैदी चपलांमध्ये मोबाइल लपवून कारागृहात जाताना सापडला. कैदी जगताप याला जयसिंगपूर न्यायालयातील सुनावणीसाठी पोलिस बंदोबस्तात हजर केले होते. दुपारी सव्वातीनच्या सुमारास परत आल्यानंतर कारागृहाच्या गेटवर सुरक्षा रक्षकांनी त्याची अंगझडती घेतली. मेटल डिटेक्टरने संदेश देताच सुरक्षा रक्षकाने कैद्याच्या चपला तपासल्या.दोन्ही चपलांचा टाचेचा भाग कुरतडून त्यात दोन मोबाइल लपवल्याचे लक्षात आले. सुरक्षा रक्षकांनी सीमकार्ड नसलेले दोन्ही मोबाइल जप्त करून त्याच्यासह त्याला मदत करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. मोबाइल लपवलेल्या चपला त्याला कोणाकडून मिळाल्या याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.बंदोबस्तावरील पोलिसांनी काय केले?कैद्यांना न्यायालयीन किंवा वैद्यकीय कामांसाठी कारागृहाबाहेर काढताना पोलिस बंदोबस्त दिला जातो. कैद्याने बाहेर कोणाशी बोलू नये, काही खाऊ नये, कोणी दिलेल्या वस्तू स्वीकारू नयेत यासाठी बंदोबस्त असतो. कैदी प्रदीप जगताप याच्या बंदोबस्तावरील पोलिसांनी काय केले? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मोबाइलचे दुकान..कळंबा कारागृहात गेल्या काही महिन्यात मोबाइल सापडण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. एवढे मोबाइल आत नेऊन कैदी दुकान काढणार आहे की काय अशी प्रतिक्रिया समाजातून व्यक्त होत आहे.