कोल्हापूर : संभाजीनगर परिसर येथील आठ वर्षांच्या शाळकरी मुलीला बुधवारी (दि.६) लॉलीपॉपदाखवून पळविण्याचा प्रयत्न फसला. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या अज्ञाताचा संशय मुलीला आल्याने तिने पळ काढला. हा प्रकार मुलीच्या आई-वडिलांना घरमालकांनी रात्री सांगितला. त्यानंतर त्यांनी गुरुवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी संभाजीनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयिताचा शोध सुरू केला आहे.
मिळालेली माहिती अशी, की संभाजीनगर नाका येथे एक दाम्पत्य भाड्याने राहते. दोघेही खासगी नोकरी करतात. त्यांची मुलगी एका विद्यालयात दुसरीच्या वर्गात शिक्षण घेते. रोज सकाळी शाळा असल्याने ती मुलगी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरात येते. त्यांच्या घरापाठीमागे टेरेस असून तेथेच त्यांची खोली आहे. बुधवारी (दि.६) नेहमीप्रमाणे ती घरी आली. ती घरी एकटीच होती व घराचे दार उघडे होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास टेरेसवरून तोंडाला रुमाल बांधून एक अज्ञात तिच्या घरात पोते घेऊन आला. तिला अज्ञाताने लॉलीपॉप दाखविले. तिला आई-वडिलांनी कोणाकडून चॉकलेट किंवा इतर कोणतेही साहित्य घ्यावयाचे नाही, असे सांगितल्याने तिचा संशय बळावला. ती घरातून पळत, रडत-रडत घराखाली असलेल्या बेकरीत गेली. तिने बेकरीच्या मालकांना हा प्रकार सांगितला. बेकरीवाल्यांनी हा प्रकार त्या मुलीच्या घरमालकांना सांगून मुलीला त्यांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, नागरिकांनी तिच्या घरात जाऊन पाहिले, तर अज्ञात तेथे नसल्याचे निदर्शनास आले. दुपारपासून ती मुलगी रात्री आठ वाजेपर्यंत घरमालकाच्या घरात बसून होती. या मुलीचे आई-वडील रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी आले, तेव्हा घरमालकांनी हा प्रकार त्यांना सांगितला. रात्र झाल्याने गुरुवारी याची माहिती पोलिसांना देण्याचा निर्णय तिच्या पालकांनी घेतला.दरम्यान, गुरुवारी या मुलीचे पालक जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आले. त्यांनी हा प्रकार पोलिसांच्या कानावर घातला; त्यामुळे पोलिसांनी संभाजीनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयिताचा शोध सुरूकेला आहे.इंजेक्शन देऊन पळविण्याचा डावसडोली (खालसा) : कारभारवाडी (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीचे अज्ञात व्यक्तींनी इंजेक्शन देऊन अपहरण करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या शाळकरी मुलीने प्रसंगावधान राखत आपली सुटका करून घेतली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. याबाबतची अधिक माहिती अशी, कारभारवाडी (ता. करवीर) येथे गावच्या पश्चिमेला प्राथमिक शाळा आहे. नेहमीप्रमाणे शाळा साडेपाच वाजता सुटते. शाळा सुटल्यानंतर मुले आपल्या घरी निघाली असता दोन पुरुष व एक महिला ज्ञानेश्वर मंदिराजवळ थांबली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास दोन मुली आपल्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्या अज्ञात महिलेने त्यामधील एका मुलीचा हात धरला व आपल्या सहकाऱ्याला टिचकी मारून इशारा केला.
त्याबरोबर अज्ञात पुरुषाने इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या धाडसी मुलीने हिसडा मारून आपली सुटका करून घेत तेथून पळ काढला. मुलीने भेदरलेल्या अवस्थेत घरातील लोकांना घडलेला प्रकार सांगितला. घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेऊन पाहिले असता अज्ञात व्यक्ती पळून गेल्या होत्या. शोधाशोध केली असता त्या सापडल्या नाहीत. अशा घटना वारंवार घडूनसुध्दा याकडे करवीर पोलीस दुर्लक्ष का करत आहेत, असा सवाल पालक करत आहेत.संशयिताचे वर्णन...संशयिताने तोंडाला रुमाल बांधला होता. त्याचे अंदाजे वय ३० ते ३५ होते. तर त्याने अंगात काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता, असे वर्णन त्या शाळकरी मुलीने सांगितले.