कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा भडका उडाला असताना मृत्यूंची संख्याही आरोग्य विभागाची डोकेदुखी बनत चालली आहे. अपुऱ्या साधनांसह कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य विभागाने अत्यवस्थ कोरोना बाधितांचे मृत्यू रोखण्याचे कसोशीने प्रयत्न चालविले आहेत. रुग्णांचे होणारे मृत्यू रोखण्याकरिता काय करावे यासंबंधीच्या सूचना जिल्हा रुग्णालयापासून कोविड केअर सेंटरपर्यंत सर्वांना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी कोरोना संसर्गाचा वेग अधिक आहे, मृत्यू होण्याचे प्रमाणही सर्वाधिक आहे. त्यामुळे आरोग्य विभागावर एक प्रकारे मानसिक दबाव वाढत आहे. दि. १ जानेवारीपासून ११ मेपर्यंतच्या साडेचार महिन्यात १०४० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. हा आकडा निश्चितच धक्कादायक आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन गडबडून गेले आहे. तातडीने जेवढ्या करता येण्यासारख्या गोष्टी आहेत तेवढ्या केल्या जात आहेत.
मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी ४०० ऑक्सिजन बेड, २५० आयसीयू बेड तर १२५ व्हेंटिलेटर बेड वाढविण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आरोग्याची यंत्रणा अधिक सक्षम करणे हे या घटकेचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यामुळे या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. निधी, वैद्यकीय साधने अपुरी आहेत याची जाणीव असूनही ही यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न होत आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालय, उपरुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोविड केअर सेंटर यांना योग्य व्यवस्थापन, वैद्यकीय सुविधा आणि सामाजिक कारणांवर लक्ष केंद्रित करुन योग्य अशा उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घरातील लपून बसलेल्या रुग्णांना शोधून काढा, दिवसातून तीनवेळ रुग्णांच्या ऑक्सिजन प्रमाणावर नियंत्रण ठेवा, संशयित रुग्णांच्या स्वॅबची मोबाईल ॲन्टिजन चाचणी करावी, ग्रामीण भागात सुपरस्प्रेडर असलेल्या भाजी विक्रेते, दुकानदार यांच्या ॲन्टिजन चाचण्या वाढवाव्यात, आरटीपीसीआर चाचण्या रोज दोन ते सहा हजार पर्यंत वाढवाव्यात अशा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.