म्हाकवे
गतवर्षी महापूर आणि कोरोनाच्या संकटातही घराघरापर्यंत जाऊन केलेल्या कामाचे दाम मागण्यासाठी आशा स्वयंसेविकांनी काम बंद आंदोलन केले. मात्र, त्यांचे हे योगदान विसरत जि .प.चे सीईओ अमन मित्तल यांनी २४ तासांत कामावर हजर व्हा, अन्यथा कार्यमुक्त करू, असा फतवाच काढला. विशेष म्हणजे हे पत्र आशांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांनी पोहोच केले आहे. तसेच, आशांच्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था उभी करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे आशांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.
आशांनीही आज, सोमवारी जि. प. समोर ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेत आर या पार ची लढाई करण्याचा निर्धार केला आहे. थकीत मानधन द्या, अन्यथा काम बंदच राहील. काय कारवाई व्हायची ती होऊ द्या, असा पवित्रा घेतला आहे. जिल्ह्यात आशा व गटप्रवर्तकांची ३ हजारांपर्यंत संख्या आहे.
आशांमुळेच वाड्यावस्त्यांंवरील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.
राज्यातील काही जि.प.नी हे थकीत मानधन दिले आहे; मात्र, कोल्हापुरात ते न देता पत्र काढून कमी करण्याचे आदेश दिले जात आहेत, ही दुर्दैवी बाब आहे.
दरम्यान, आशांच्या लढाईला जिल्ह्यातील सर्वच कामगार संघटना पाठिंबा देत असल्याचे काॅ. भरमा कांबळे व काॅ. शिवाजी मगदूम यांनी सांगितले.
" जिवाची बाजी लावून कोरोना काळात प्रशासनाला सहकार्य केले.मात्र, प्रशासनच निलंबनाची धमकी देत आहे. अखेर प्रशासनाने आपले खरे रूप दाखवलेच आहे. त्यामुळे आता आम्हीही एकसंध होऊन लढा देणार आहोत.
उज्ज्वला पाटील
जिल्हासचिव, आशा व गटप्रवर्तक युनियन
जि.प.समोर आज ठिय्या....
आशांनी पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांसह लोकप्रतिनिधींना निवेदने देत भेट घेतली. याबाबत आज, सोमवारी प्रशासनासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे सर्वांनीच आश्वासन दिले आहे, तर आज जि. प. समोर सर्वच आशा ठिय्या आंदोलन करणार आहेत.